राजे लखुजी जाधवराव |
सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला. त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवराव यांच्या आश्रयाला गेली. जाधवांचे आणि मुळेंचे चांगले संबंध असावेत. पैठणची जहागीर लक्ष्मणराव उर्फ लखुजी जाधवराव नावाच्या मनसबदाराकडे होती. त्यांच्यासमोर मुळेच्या पत्नीने आपली व्यथा मांडली. लखुजी स्वतः फौज घेऊन सिंदखेड येथे आले. त्यांनी रवीरावला पकडून ठार मारले. ही गोष्ट निझामशहाच्या कानावर गेली. काझीस राजकारणात रस राहिलेला नाही हे शहाच्या लक्षात आलं असावं. ई. स. १५७५ साली लखुजी जाधवराव यांच्या जहागिरीला सिंदखेडचा मुलुख जोडण्यात आला. कालांतराने लखुजी सिंदखेड येथे वास्तव्यास आले आणि सिंदखेडचे राजे लखुजी जाधवराव म्हणून ओळखले जाऊ लागले.
१७ व्या शतकात वऱ्हाडाची दोन वेळा पुनर्रचना केली गेली, पण वऱ्हाडचे मुख्यतः दोन भाग पडतात. नरनाळा-गाविलगड पासून बाळापूर ते जालन्यापर्यंत एक भाग, आणि माहूर-बालाघाट हा दुसरा भाग. सिंदखेड हे वर्हाड प्रांतात येत असे. ई. स. १५७४ मध्ये संपुर्ण वऱ्हाड निजामशाहीच्या अंमलाखाली आलेले होते. ई. स. १५७५ मध्ये जाधवांची जहागीर पैठण पासून मेहकर पर्यंत वाढली होती. जाधवरावांकडे एकूण ५२ महालांचा प्रदेश होता.
जाधवराव घराण्याच्या इतिहासाबद्दल दोन समज इतिहासकारांमध्ये प्रचलित आहेत. पहिल्यानुसार जाधव हे देवगिरीचे राजे यादव यांच्या घराण्याच्या एका शाखेचे वंशज आहेत. तर दुसऱ्यानुसार लखुजी राजपुतान्यातील करोली येथील एका राजपूत कुटुंबातील होते. ई. स. १५५० च्या दरम्यान त्या कुटुंबाच्या दोन व्यक्ती महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्या. त्यांनी शेती करून आपली उपजीविका चालवली. लखुजी त्या कुटुंबाचे प्रमुख होते. पुढे निजामशाहच्या नजरेत लखुजींची योग्यता आली आणि त्यांना सिंदखेडची जहागीर देण्यात आली. पहिली कथा जाधवरावांच्या बखरीत लिहिलेली आढळते. ती सत्य असण्याची शक्यता आहे. खिलजीने यादवांना पराभूत केल्यावर गोविंददेव हे त्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र ठाकुरजी जाधव यांची पैठण जवळ जहागीर असल्याचे कळते. पुढे बहामनी सलतनतीच्या काळात ठाकूरजींचे पुत्र भेटोजी यांनी घराण्याचा लौकिक वाढवला. त्यांचे पुत्र विठ्ठलदेव हे ई. स. १५६५ साली तालिकोट्याच्या युद्धात निजामशहाकडून लढले. विठ्ठलदेव जाधव हे लखुजी जाधवराव यांचे वडील. वडिलोपार्जित जहागीरदारी लखुजींकडे आली. त्यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर पाचहजारी मनसबदारी मिळवली. ई. स. १५७५ मध्ये सिंदखेड मिळाल्यानंतर त्यांना निजामशाहीत दशहजारी मनसबदाराचा मान मिळाला. लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील एक प्रमुख सरदार म्हणून उदयास आले.
लखुजी जाधवराव ह्यांच्या तीन पत्नी - यमुनाबाई, भगीरथीबाई आणि गिरिजाबाई. त्यांना चार मुले - दत्ताजी, अचलोजी, रघुजी,बहादुरजी आणि जिजाबाई नावाची एक मुलगी होती. जाधवराव घराण्यातील प्रत्येक पुरुषाने निजामशाहीत आपल्या शौर्याने मनसबदारी कमावली. त्यामुळे पुढे जाधवराव घराण्याला २४००० पायदळ आणि १५००० घोडदळाची मनसबदारी शाहजहानने दिल्याची नोंद आहे. दख्खन मधले कदाचित ते पहिले बलाढ्य मराठा सरदार असावेत. त्यांच्यानंतर भोसले, कायथ, उदाराम पंडीत, या मराठा सरदारांना दख्खन मध्ये महत्त्व प्राप्त झाले. १६ व्या शतकाच्या अखेरपर्यंत भोसले हे लखुजींच्या बरोबरीने महत्वपूर्ण सरदार बनले होते. ई. स. १६०४ मध्ये लखुजींनी आपली मुलगी जिजाबाई हीचा मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजी राजे यांच्याशी विवाह लावून दिला. त्यामुळे दोन बलाढ्य घराण्यांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि दख्खन मध्ये मराठा शक्तीचा सूर्य उदयास येऊ लागला. पण काही काळातच खंडागळ्याच्या हत्तीच्या घटनेने दोन घराण्यांमध्ये वित्तुष्ट झाले. आणि पुढे बराच काळ ते तसेच राहिले.
पुढे वाचा ‘खंडागळ्याच्या हत्तीचे प्रकरण आणि जाधव भोसले वितृष्ट’ भाग २ मध्ये.
संदर्भ सूची :
१. सिंदखेडकर राजे जाधवरावांची बखर
२. कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत
३. Berar Under the Mughals – Mohd. Yaseen Quddusi
४. Maasir ul Umara
©Copyrights reserved.
Very well explained!
ReplyDelete