ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले.
इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाखल झाला. बुऱ्हाणपूरला पोहोचताच त्याने मलिक अंबर विरुद्ध आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला. मलिक अंबरला आदिलशाह आणि कुतुबशाह यांची मदत मिळू नये म्हणून त्याने प्रयत्न चालवले. आपल्या सैन्याचा उत्साह वाढावा म्हणून जहाँगीर १० नोव्हेंबर,१६१६ ला मांडव (इंदौरच्या नैऋत्येला असलेले एक मध्ययुगीन शहर) येथे येऊन थांबला होता. आदिलशाह आणि कुतुबशाह यांनी खुर्रमला भेटवस्तू पाठवून अंबरला मदत न करण्याचे मान्य केले. भल्या मोठ्या फौजेनिशी चालून आलेल्या खूर्रम समोर आपला निभाव लागणार नाही आणि आदिलशाह नि कुतुबशाह यांची मदतही मिळणार नाही हे जाणून मलिक अंबरने खुर्रमशी तहाची बोलणी सुरू केली. स्वतः त्याने बालाघाट‡(वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांचा काही भाग) प्रांतातील काही किल्ल्यांच्या चाव्या खुर्रमच्या हवाली केल्या. मिळालेल्या मुलखाची व्यवस्था लावून शाहजादा खुर्रम मांडव येथे आला. सहजासहजी यश मिळालं होतं. बाप बेट्यावर खुश होता. खुर्रमचं जंगी स्वागत करण्यात आलं. जहाँगीरने त्याला ‘ शहाजहान ’ ही पदवी दिली. त्यावेळी त्याला काय माहीती की पुढे हाच शहाजहान त्याच्याच विरुद्ध बंड करणार आहे.
याच दरम्यान उदारामांना जहाँगीर बादशहाने भेटीसाठी बोलावले. त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. या भेटीचा तपशील जहाँगीरने स्वतःच्या रोजनिशित लिहून ठेवला आहे. राजे उदाराम मुघल छावणीत कसे आले, याची हकीकतही त्याने त्यात लिहून ठेवली आहे. राजे उदाराम ‘कामाचा माणूस’ असल्याचा उल्लेख त्याच्या रोजनिशीत आढळतो. दख्खन मध्ये विजय मिळवायचा असेल तर मराठा सरदारांवाचून पर्याय नाही हे तो जाणून होता. त्यामुळे आलेल्या सरदारांना खुश ठेवण्याचा तो प्रयत्न करत होता. काही दिवस उदाजीराम तिथेच होते.
मलिक अंबरने जरी माघार घेतली असली तरी त्याच्यासाठी ही युद्धाची समाप्ती नव्हती. थोड्याशा विजयाने हुरळून जायला तो काही मुघल नव्हता. खुर्रम गेला त्यानंतर काही काळातच त्याने पुन्हा दख्खनच्या शाह्यांची एक संयुक्त आघाडी तयार केली आणि मुघल फौजेवर हल्ले सुरू केले. मुघलांना दिलेले आपले मुलुख परत मिळवण्यासाठी त्याने अनेक चढाया केल्या. बालाघाट प्रांत परत मिळवून त्याने कर वसुली सुरू केली. ई. स. १६१९ मध्ये त्याने विजयाची मालिका पुढे खेचत आणि मुघल फौजेची दाणादाण उडवत मुघल फौजेला थेट बुऱ्हाणपूरापर्यंत रेटत नेलं आणि बुऱ्हाणपूराला वेढा घातला.
शहाजहानला जहाँगीरने बुऱ्हाणपूराकडे जाण्याचे आदेश दिले. पण यावेळेला उत्तरेच्या राजकारणात तख्ताच्या खेळाचा रंग मिसळला होता. शाहजादा खुसरौला कैद करण्यात आलं होतं. जोपर्यंत खुसरौला आपल्या हवाली केलं जात नाही तोपर्यंत शहाजहान दख्खन मध्ये जायला तयार नव्हता. अखेर त्याच्या मनाप्रमाणे घडून आल्यावर ई. स. १६२१ मध्ये त्याने बुऱ्हाणपूर कडे आपला मोर्चा वळवला. मार्चच्या सुरुवातीला शहाजहान बुऱ्हाणपूरला आला. शहाजहानच्या मोठ्या सैन्याला आणि तोफखान्याला तोंड देण्याआधीच दख्खनच्या सैन्याने बुऱ्हाणपूरचा वेढा उठवला. शहाजहानने आपल्या सैन्याची पाच विभागात विभागणी केली. त्यातील दोन त्याने आपल्या हाताखाली ठेवले. आणि दख्खनी सैन्याचा पाठलाग सुरू केला. आधी अहमदनगर कडे कूच करून त्याने अहमदनगर आपल्या ताब्यात घेतले. पुढे जाऊन निजामशाहीची राजधानी असलेलं खडकी शहर - आताचं औरंगाबाद - त्याने हस्तगत केलं. आणि पुन्हा एकदा जाळून बेचिराख केलं. मलिक अंबरने पुन्हा शहाजहानशी तहाची बोलणी सुरू केली. या तहानुसार अंबरने त्याला आधीचा मुलुख परत केला आणि अजुन चौदा कोसांचा मुलुख दिला. तसेच पन्नास लाख रुपये पेशकश देण्याचे कबुल केले. आपल्या बापाचं तख्त भावाला मिळू नये, म्हणून शहाजहान चिंतित होता. त्याने लगेच तह मान्य केला आणि तो उत्तरेत निघून गेला.
याच दरम्यान पुन्हा सरदार लखुजी जाधवराव आणि मलिक अंबर यांच्यातील मतभेद टोकाला गेले. भोसल्यांशी असलेल्या वैराचीही त्यात भर पडली. आणि ई. स. १६२१ च्या अंती जाधवराव निजामशाही सोडून शहाजहानच्या सैन्यात सामील झाले. या त्यांच्या निर्णयामागे राजे उदाराम यांचेही प्रयत्न असावेत. या काळात निजामशाहीतील मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे नि शरीफजीराजे तसेच विठोजीराजांचे आठ पुत्र या भोसल्यांनी आपल्या शौर्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व प्रस्थापित केले होते. या सगळ्या भोसल्यांचे अग्रणी महाराज शहाजी राजे भोसले होते. जाधवरावांची कमतरता भरून काढायला भोसले असल्यामुळेच या वेळी मलिक अंबरने जाधवरावांची मर्जी राखण्याचे कष्ट घेतले नसावे.
काही इतिहासकारांच्या मते, मराठा सरदारांना आमिष दाखवून त्यांना मुघल सैन्यात सामील करवून घेण्याचा प्रयत्न याकाळात सुरू होता. त्या अमिषाला बळी पडून जाधवराव आणि उदाराम यांनी मुघलांचा पक्ष स्वीकारला. ही गोष्ट दोन्ही सरदारांच्या बाबतीत तितकीशी खरी वाटत नाही. लखुजी जाधवराव हे एक बलाढ्य सरदार होते. त्यांच्या जीवनशैलीकडे बघता ते एका स्वतंत्र राजाप्रमाणे जीवन जगले, असे स्पष्ट लक्षात येते. उदाजीराम यांनी ई.स.१६१७ मध्ये आधी आदिलशहाशी संपर्क साधल्याचा पुरावा सापडतो. अमिषापोटी जर ते मुघलांना मिळते, तर ते आधी निजामशाहीत परतले नसते, आणि त्यानंतर त्यांनी आदिलशहाशी पत्रव्यवहार केला नसता. मलिक अंबरशी असलेले मतभेद सोडून दुसरे कुठले कारण त्यांनी पक्ष बदलण्यामागे नसावे. मलिक अंबरचा मृत्यू होईपर्यंत हे दोनच मराठा सरदार मुघलांकडून लढताना आपल्याला दिसतात. पुढे जसजशी निजामशाही बुडत गेली, तसतसे अनेक मराठा सरदार मुघल सेवेत दाखल झाले. त्यात अनेक भोसल्यांचाही समावेश आहे.
(† वाचा “मराठ्यांचे महत्त्व भाग २- रोशनगावची लढाई!” वऱ्हाडनामा वर)
(‡ उत्तर वऱ्हाडला ३ भागांमध्ये विभागलं गेलं होतं. मेळघाट, पायनघाट आणि बालाघाट.)
***
संदर्भ सूची :
१. History of Jahangir – Beni Prasad
२. शिवकालीन पत्र सार संग्रह
३. Berar under the Mughals – Mohd. Yaseen QuddusI
४. कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत
५. Tuzuk I Jahagiri – Rogers and Beveridge
६. New history of Marathas – G.S.Sardesai
७. Thesis submitted by Mohd. Siraj Anwar : Relations of The Mughal empire with The Ahmadnagar kingdom.
८. ‘Malik Ambar’ By Jogindranath Chowdhury
©Copyrights reserved.
Comments
Post a Comment