शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.
भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त राजा करत असे. एक दिवस राजा वाघांच्या पिंजऱ्यात झाडझुड करायला गेल्यावर अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली, ज्यात त्याला भारी जखम झाली. काही महिने त्याला अकोला येथे दवाखान्यात भरती करण्यात आलं. तिथे तो काँग्रेसच्या नेत्यांच्या भाषणाला हजेरी लावायला लागला. राजा परत माहूरला आला तो डोक्यात ब्रिटिशांप्रती राग आणि हृदयात स्वातंत्र्याची आग घेऊन.
एक दिवस शामाला घरी बोलवायला चंदन नावाचा त्याचा मित्र आला. भाऊसाहेबांच्या सांगण्यावरून राजाबरोबर शिकारीला जायचं होतं. सोबत होता पुसदचा महम्मद हुसैन. चौघे - राजा, शामा, चंदन आणि महम्मद हुसैन - शिकारीसाठी निघाले. दिवसभर फिरून देखील त्यांना मनाला भावेल तशी शिकार भेटली नाही. माहूर जवळच धनोडा नावाचे गाव आहे. महम्मद म्हणाला, “ तिथला सावकार माझा मित्र आहे, त्याच्या घरी चहा घेऊ.” सगळे राजी झाले. राजा आणि महम्मद यांच्यात आपसात काहीतरी कुजबुज सुरू होती. शामाने त्याकडे दुर्लक्ष केलं. सावकाराच्या घरी पोहोचताच महम्मदने कडी वाजवली. दरवाजा सावकारानेच उघडला. दरवाजा उघडताच महंमदने त्याच्या छातीवर बंदुकीची नळी ठेवली अन् ट्रिगर दाबला. मोठ्ठा आवाज झाला आणि काही कळायच्या आतच सावकार जमिनीवर कोसळला. त्याला मारताच महम्मद, राजा अन् चंदन तिघेही गावातून पळून जाऊ लागले. शामाला काही सुचेना. थोड्या वेळाने तोही त्यांच्या मागे पळत गेला. अंधार पडत आला होता. सगळीकडे बातमी पसरली होती. शामावर नसती बिलामत आली होती. ते सगळे तसेच आपापल्या घरी गेले. महंमद पुसदला निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शामाला पोलिसांनी अटक केली. राजा आणि चंदन फरार होते. शामाला भाऊसाहेबांच्या वाड्यावर नेण्यात आलं. पोलिस भाऊसाहेबांशी काहीतरी बोलत होते. थोडी विचारपूस झाली. पोलिसांनी भाऊसाहेबांच्या सांगण्यावरून शामाला त्यांच्याच वाड्यात ठेवलं आणि ते राजा- चंदनच्या शोधात निघून गेले.
भाऊसाहेबांनी राजा आणि चंदनला आपल्या वाड्यातच लपवून ठेवलं होतं. तिघांची परत भेट झाली. भाऊसाहेबांनी तिघांना ‘ स्वतःला पोलिसांच्या हवाली करा. मी तुमची सुटका करवतो.’ असं आश्वासन दिलं आणि ते निघून गेले. राजाला साहजिकच पोलीसांना शरण जाऊन त्यांच्या दयेखाली सुटण्यात काहीच रस नव्हता. त्याने दोघांनाही फरार होण्यासाठी प्रवृत्त केलं. शामाची आणि राजाची अगदी लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. शामाच्या मनात काय आलं असेल त्यालाच ठाऊक, त्यानेही होकार दिला. हा निर्णय घेतल्यावर पुढचं आयुष्य फरार जगायचं होतं, जंगलाने राहायचं होतं. तरीही त्याची फिकीर न करता तिघांनी आपापल्या घरी शेवटची भेट देण्याचा निर्णय घेतला. घरून थेट मातृतीर्थावर भेटण्याचं ठरलं. तिघही मध्यरात्रीनंतर वाड्यातून पसार झाले. शामा घरी गेला. आपल्या दोन भावांना आणि आईला त्याने आपला निर्णय कळवला. सगळे आधीच काळजीत होते. आता घरात रडारड सुरू झाली. शामानं सगळ्यांचं सांत्वन केलं. भाऊ पूनाजी आणि गणपत कोलाम यांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावून द्यायला सांगितलं. “दसरथले अंतर द्यू नोका. आता माह्यं काय होईन काई सांगता येत नाही. पर ही काई आपली शेवटचीच भेट नाही, हे खरं.” असं बोलून तो घरादाराचा त्याग करून निघुन गेला. गावात पोलीस तैनात होते. मुख्यतः चंदन आणि राजाच्या घराजवळच. तिकडे एका पोलिसाने राजाला अडवलं. दोघांत झटापट झाली. राजाने त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गोळीच्या आवाजाने सगळं गाव जागं झालं. तिघेही मातृतीर्थापाशी भेटले. शामाला राजाची वागणूक पसंत पडली नाही. पोलिसाला मारल्याने आता आपण पक्के गुन्हेगार झालो आहोत याची त्याला जाणीव झाली होती. पण राजाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं...
गावातून पळ काढल्यावर ते कधी आजूबाजूच्या जंगलात तर कधी माहूरच्या किल्ल्यावर दिवस काढू लागले. गावातून जेवणाचा आणि दारूचा पुरवठा होत असे. पण हा पुरवठा अखंड चालणार नव्हता. सध्या आयुष्य फक्त फराराचं होतं. रोज काहीतरी शिकार करून खायचं आणि दिवस काढायचे. पोलिस मागोवा घेत आले की दुसरीकडे जाऊन लपायचं, हेच सुरू होतं. चंदन एक दिवस माहूर गावात गेला आणि परत आलाच नाही. त्याला भाऊसाहेबांनी वाड्यावर बोलावून पोलीसांना शरण जाण्यासाठी सांगितलं असावं. दोन दिवसांनी तो आर्णीच्या पोलीस ठाण्यात हजर झाला.
सहा सात महिने असेच गेले. गावात एक कुंदनसिंग नावाचा माणूस होता. कुंदनसिंग आणि त्याचा सावत्र भाऊ यांच्यात प्रॉपर्टी वरून वाद सुरू होता. त्यात तहसीलदाराने कुंदनसिंगचा वाडा ताब्यात घेतला. स्वतः तहसीलदार तिथे राहत असे. तहसीलदार वाडा रिकामा करून देईना. कुंदन सिंग एक दिवस शामा आणि राजाला भेटायला आला. त्याने त्यांना तहसीलदाराच्या खुनाची सुपारी दिली. राजाने होकार दिला. पण शामाने त्याला तसं काही करू दिलं नाही. एक दिवस रागारागात कुंदनसिंगनेच तहसीलदाराचा खून केला. आणि त्यांच्यासोबत राहायला आला. गावातील काही मुलं या तिघांना मदत करत. खाण्यापिण्याचं सामान, दारू, बोकडं, यांचा पुरवठा करत असत. ते तिघेही यांच्यासोबतच राहू लागले. आता ही पूर्ण सहा जणांची - वाघ्या, शिवर्या, रज्जाक, शामा, राजा, आणि कुंदनसिंग - टोळीच झाली होती.
राजा आणि कुंदनसिंग यांनी आजूबाजूच्या गावातील लोकांकडून हफ्ता वसूली करण्याचं ठरवलं. डाकूच बनायचं त्यांचं ठरलं होतं. शामाने त्याचा विरोध केला. शामा म्हणे ‘फक्त सावकारांकडून पैसे गोळा करू. गरिबांना सोडून देऊ.’ हा शामाचा हट्ट होता आणि कुंदनसिंग मानेना. शेवटी शामानं त्यांच्यापासून वेगळं राहायचं ठरवलं. आणि एके रात्री तो निघून गेला. अधूनमधून जंगलाने त्यांची नजरभेट होत असे. पण कोणीच कोणाशी बोलत नसे. असेच काही दिवस गेल्यावर राजा त्याला भेटायला आला आणि आपल्याबरोबर येण्यासाठी आर्जव करू लागला. शेवटी शामा राजी झाला, पण सशर्त. शर्त ही होती, की गावागावात जाऊन वसूली करताना शामा वसूली करणार नाही, बाकीच्यांनी करायची. शामा त्यांच्या पासून काही अंतरावर जाऊन उभा राहील. सगळ्या शर्ती मान्य करून शामाला राजा आपल्या बरोबर घेऊन आला.
माहूरच्या ईशान्येला मच्छिंद्रपार्डी नावाचे गाव आहे. राजा आणि कुंदन सिंगने मच्छिंद्रपार्डीत वसूली करण्याचा निर्णय घेतला. सगळे तिथे गेले. सावकार गोदाजी मुखरेंच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. हाती बंदुका घेऊन पैसे वसूल करण्याची ही पहिलीच वेळ होती. मुखरेंनी थैलीच भरून दिली. गावात सगळ्यांना दम दिला गेला. सगळ्यांनी आपापल्या जवळचे पैसे काढून दिले. शामाला हे पटेना. पण मैत्रीखातर म्हणून तो आला होता. सगळ्या गावातून आवतामागे दहा रुपये वसूल केले गेले. पहिल्याच दिवशी साठ हजार रुपये जमा झाले. आता त्यांची रोज एका एका गावातून वसूली सुरू झाली. दिवसेंदिवस या डाकुंचा त्रास वाढू लागला, तशा पोलीस ठाण्यात तक्रारी पडू लागल्या. त्याच वेगाने पोलिसांनी यांना पकडण्यासाठी कंबर कसली.
आता फरार होऊन वर्ष होत आलं होतं. टोळीचा मुक्काम किल्ल्यावर होता. दुपार होत आली असल्यामुळे जेवणाची व्यवस्था लावायला राजा गावात जाऊन एक बोकुड घेऊन आला. दगडांची चूल रचून त्यावर मटण आणि भात शिजायला टाकलं. इतक्यात गावातून एक खबरी बातमी घेऊन आला. ‘ पोलीसांना ऑर्डर आहेत. दिसल्याजागी टोळीतील कोणालाही गोळी घालून मारण्याचे. गावकऱ्यांनी तुमचा पत्ता सांगितला. पोलिस किल्ल्याकडेच येत आहेत.’ त्यांनी किल्ल्यावरून खाली बघितलं. गावाकडच्या बाजूला २००-३०० पोलीस येऊन थांबले होते. आता नाही तर थोड्यावेळाने पोलिसांसोबत सामना करायचाच होता. राजा म्हणे आपण इथूनच त्यांच्यावर गोळीबार करू. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्या बंदुकात काडतुसं भरले आणि पोलिसांवर जोराचा मारा केला. अचानक झालेल्या माऱ्याला पोलीसांना उत्तर देता आलं नाही. तरी त्यातल्या काही पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. अखेर पोलीस पांगले. थोड्याच वेळात गावकरी लोक पोलीसांना घेऊन महाकाली बुरुजाच्या रस्त्याने येताना दिसले. टोळीने किल्ला सोडला आणि आत जंगलात जाऊन थांबले. रात्र झाल्यावर पुन्हा किल्ल्यावर आले. पण या वेळी पोलीस जरा जास्तच खंबीर झाले होते. रात्रीचं जेवण सुरू असताना अचानक टोळीवर हल्ला झाला. पोलिस किल्ल्यावर येऊन पोहोचले होते. प्रत्युत्तर देता देता राजा आणि कुंदन सिंग गंभीर जखमी झाले. वाघ्या आणि इतर दोघं पळून गेले. शामाने एक जागा हेरली आणि तो लपून राहिला. तिथून तो पोलीसांवर गोळ्या झाडू लागला. थोड्यावेळाने राजा आणि कुंदनसिंह थांबले. पोलिसांचा गोळीबारही थांबला. पोलिसांनी गावकऱ्यांना समोर जाऊन बघायला सांगितलं. गावकरी शामाच्या जवळ येऊ लागले. शामा आपल्या जागेवरून उठला. त्याने राजाला हलवून बघितलं. राजा निपचित पडला होता. कुंदनसिंगला आवाज देऊन बघितला त्याचंही उत्तर आलं नाही. लोक जवळ येत होते. शामा ने एक गोळी गावकऱ्यांच्या डोक्यावरून झाडली. सगळे गावकरी पसार झाले. पोलिसही भितीने मागे हटले. शामाला आता तिथून निघून जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शामाने पोलिसांवर अजून गोळ्या झाडल्या आणि तिथून पसार झाला.
शामा मध्यरात्रीच्या वेळी अजनी गावी आला. वस्तीच्या नाईकाला भेटला. दुसऱ्या दिवशी वाघ्या आणि शिवर्या पोलीसांना शरण गेले. गावकऱ्यांनीच त्यांना शामाच्या सांगण्यावरून पोलिसांत नेऊन दिलं.
गावचे पाटील म्हणाले, “शामाजी, हे दोघं शरण चालले. तुमचे दोन साथीदार आधीच मारले गेलेत. आता तुम्ही एकटेच आणि तुमच्या मागे सगळी पोलिसांची फौज. तुम्ही पण शरण का नाही येत? मी म्हणतो, तुम्ही पण ठाण्यावर हजर व्हा..”
त्यावर शामा म्हणे, “ तू म्हणतं ते बराबर हाय, मले वाटते. पन ठाण्यावर खुद हजर होणं हा डाकूचा धरम नाही. मी आखरीलोक तसं करणार नाही. मरीन तं पोलीसाईच्या बंदुकीची गोयी खाऊनच मरीन. हे माही जिद हाय.”
वर्षभरातच शामाचे सगळे साथीदार निघून गेले होते. पण त्याच्या भक्कम आयुष्याला नाजूक किनार देणारी, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी आणि वेळ प्रसंगी त्याच्या खांद्याला खांदा लावून झुंज देणारी ‘शारजी’ त्याच्या आयुष्यात आली. पुढे चौदा वर्षे शामाचे दुसरे नाव होते ‘टेरर’. ‘शामा कोलाम’ नाव ऐकताच अनेकांची पाचावर धारण बसे. दोघांनी अनेक सावकारांच्या घरांवर डाके टाकले. पण ते एका हाताने लुटत होते आणि शंभर हातांनी वाटत होते. गोळा बेरीज करून शेवटी शामाच्या हातात काहीच पैसे उरत नसत. बघता बघता शामा चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि आदिलाबाद या जिल्ह्यांतील गरिबांचा देवता झाला.
१. (राजे उदाराम घराण्याचे १८०३ साली ६ भावंडांमध्ये वाशिम, कळमनुरी, पुसद, वारा, माहूर आणि उमरखेड असे ६ विभाग पडले होते.)
२. शिकारी राजाच्या जीवनावर राजे मधुकरराव देशमुख यांनी पुस्तक लिहिले आहे - ‘शिकारी राजा’ , निर्मल प्रकाशन, नांदेड
संदर्भ :
१. बिलामत , लेखक - श्री. दिनकर दाभाडे
२. शिकारनामा, लेखक - राजे मधुकरराव देशमुख, माहूर
पुढे वाचा :
भाग २ - शामा कोलामचा रामराम पोहोचे
भाग ३ - रझाकारांचा कर्दनकाळ - शामा कोलाम
© विनीत राजे
Suresh kumre
ReplyDeleteखूप चांगली माहिती आहे आणी ही माहिती कोलाम समाजाच्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचला पाहिजे
ReplyDelete