१९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.
घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शामा स्वतः उनी- उमरी नावाच्या गावी जाऊन भिवरेचं लग्न ठरवून आला. काही दिवसात तिचं लग्न झालं. आपल्यासोबत भिवरेच्या आयुष्याची ससेहोलपट होऊ नये याची शामाने काळजी घेतली होती.
पुढे काही काळ आदिलाबादच्या जंगलात काढून शामा परत नांदेड जिल्ह्यात आला. त्याच परिसरात भगवानसिंह नावाचा अजून एक डाकू होता. त्याने शामासोबत येऊन राहण्याचा आग्रह केला. भगवानसिंह लोकांवर अत्याचार करी. कित्येक लेकीबाळींची अब्रू लुटून, गरिबांना लुटून त्याने दहशत बसवली होती. तो सामान्य लोकांना नकोसा झाला होता. शामाने त्याच्यासोबत हातमिळवणी करण्यास नकार दिला. आणि ठणकावून सांगितलं “तूही चाल निराळी. अन् माही चाल निराळी. तू मह्यासंगं राहायचं तं सोडून दे. माह्या इलाख्यात बी दिसू नको. दिसला तं याद राख.” काही दिवसांत तो एका मुलीवर बलात्कार करत असताना लोकांनी पोलिसांना बोलावून आणलंं. आणि शूटआऊट मध्ये भगवानसिंह मारला गेला.शामाचा मुक्काम माहूरच्या किल्ल्यावरच होता. गावातून एक जण निरोप घेऊन आला. त्याच्या मोठ्या बहिणीने - सारजाबाईने - त्याला घरी बोलावलं होतं. कोलाम पाड्यावर खबर दिली गेली. मध्यरात्रीनंतर शामा गावात येणार होता. शामा घरी आला. त्याच्या भोवती लोकांचा गराडा पडला. इकडतिकडच्या गप्पा झाल्या. आणि सारजाबाईने शामाला ‘शारजी’ नावाच्या मुलीची ओळख करून दिली. शारजी राहणारी माहूरचीच होती. लग्न झालेली. घरी नवऱ्याच्या आणि सासू - सासऱ्याच्या त्रासाला कंटाळलेली. आणि शामाच्या प्रेमात पडलेली. तिने हट्ट धरला शामा बरोबर जांगलात जाऊन राहण्याचा. शामाने आधी तिची समजूत घालून बघितली. पण तिचा हट्ट तिळमात्रही ढळला नाही. “मले संग न्या. न्हाई त मी जीव देईन” असं ती शामाला वारंवार सांगू लागली. जंगलात राहणं सोपं नाही, हे शामा तिला समजावून सांगत होता पण तरीही ती तिच्या निश्चयावर ठाम होती. अखेर शामा तयार झाला. पण तिच्या नवऱ्याबद्दल त्याला वाईट वाटू लागलं. “त्येनं आपलं काहीच बिघडोलं नाही अन् आपुन त्येची बायको घेऊन चाललो” असे विचार त्याच्या मनात येत होते. सकाळ होत आली. शामाने एका माणसाजवळ शारजीच्या नवऱ्यासाठी निरोप धाडला आणि सांगितलं की , “शारजीचाच हट्ट होता. ते तिच्या मनानंच आली.”
पुढे काही काळ शारजीला ट्रेनिंग देण्यात गेला. कोलामी भाषेपासून ते बंदूक चालावण्यापर्यंत शामाने शारजीला सगळं शिकवलं. शामाएवढीच धाडसी शारजी पटापट सगळं आत्मसात करू लागली. आणि काही दिवसांतच शामा प्रमाणेच तरबेजही झाली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत तिने शामाच्या खांद्याला खांदा लावून अगदी शेवटपर्यंत झुंज दिली. एका हल्ल्यात तिला दोन गोळ्याही लागल्या होत्या. जंगलाच्या साहाय्याने दोघांनीही आपला संसार सुरु केला. घर म्हणून असं काही नाही. कधी या जंगलात तर कधी त्या जंगलात ते राहत असत. बहुतेक करून त्यांचा मुक्काम माहूरच्या डुक्कर किल्ल्यावरच असे. पोलिस मागोवा घेत घेत आलेच तर तिथून पसार होऊन ते आत अजून दाट जंगलात निघून जात. एक दोन दिवसांनी शामाचाच एखादा माणूस पोलीसांना खोटी बातमी देई. तिसऱ्याच कुठल्यातरी गावात शामा आहे असं सांगून पोलिसांना भुलवून देई. मग पोलीस त्या गावी शोध घेत जात, शामा पुन्हा किल्ल्यावर येऊन राही.
अनेक वेळा शामा वेश बदलून गावात येणं जाणं करी. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होऊन जाई. एकदा काही पोलिसांसोबत बसून तो चहा प्यायला. पण पोलीसांना कळालं नाही की हा शामा कोलाम आहे. असेच काही किस्से झाल्यानंतर पोलिसही वेगवेगळी सोंगं घेऊन त्याचा मागोवा घेत त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होती. पण त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते. शामाला त्यांची आधीच गावकऱ्यांमार्फत खबर मिळत असे.
वाटखर्चासाठी पैसे लागत तेव्हा शामा एखाद्या सावकाराला जाऊन हजार दोन हजार रुपये मागी. तोही चुपचाप काढून देई. पण एवढ्याने भागणार नव्हते म्हणून शामाने एक नवीन योजना आखली. कनकवाडी नावाच्या गावी एक सावकार होता. गावकऱ्यांचे सगळे सोने नाणे त्याच्याकडे गहाण होते. लुगडं चोळी अन् मणभर ज्वारीसाठी त्याने लोकांच्या जमिनी लिहून घेतल्या होत्या. कोणी गरीब दुबळा पैसे मागायला गेला तर दिडी शिवाय तो बोलेना. त्याच्याकडे काही दयामाया नव्हती. शामाचा एक मित्र - कोंडीबा- त्याच गावचा होता. त्यांनी एक प्लॅन रचला.
भरपूर सोनंनाणं जमा झालं होतं. शामाने एका ओळखीच्या सावकाराच्या घरी एक एक गाठोडं पाठवलं. मोजदाद झाली. गरजेपेक्षा खुप जास्त पैसे जमा झाले होते. शामाने गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही लोकांना त्याने जमीन विकत घेऊन दिली. तो सावकाराला निरोप पाठवी - असलेल्या पैशातून अमुक अमुक माणसाच्या नावे अमुक एक्कर शेतजमीन विकत घ्या. काही लोकांना घरे नव्हती. त्याने त्यांना घर बांधायला मदत केली. काही लोकांना व्यवसायाला, काहींना मळा फुलवायला, काहींना शेती करायला, काहींना शिक्षणाला असे तो पैसे देऊ लागला. हळू हळू आदिलाबाद, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात बातमी पसरली की शामा कोलाम गरिबांना मदत करतो आहे. दूरदूरून लोक मदत मागायला येऊ लागले. ते येत आणि शामा त्यांना मदत करी. असं करता करता शामा जवळचे पैसे संपू लागले. पण त्याच्या भोवती गरजू लोकांचा गराडा पडू लागला. मदत घेऊन काही लोकांनी सांधीचं सोनं केलं. त्याबद्दल पुढच्या भागांत येईलच. लोक येत होते, पैसै मागत होते. त्यांना मदत करायला आता शामा जवळ पुरेसे पैसे उरले नव्हते. अशा वेळी लोक गळ घालत तेव्हा शामा त्या गरजू सोबत एखाद्या सावकारासाठी चिठ्ठी पाठवी :
शामा कोलामचा रामराम पोहोचे.
xxxxx माणसाजवळ हजार रुपये देणे.”
पुढे वाचा :
भाग ३ - रझाकारांचा कर्दनकाळ : शामा दादा कोलाम
संदर्भ : बिलामत - लेखक : दिनकर दाभाडे
( बिलामत ही कादंबरी स्वतः शामा दादांच्या हयातीत प्रकाशित झाली.)
© विनीत राजे
Part३ नाही येत आहे सर please send kara part 3
ReplyDelete