देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष |
मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.
ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुरूवातीची काही वर्षे तो शाहजादा खुसरौच्या बंडामुळे आणि पर्शियन शाहच्या आक्रमणामुळे दख्खनकडे लक्ष देऊ शकला नाही. याकाळात अब्दूर रहीम खान इ खानान हा दख्खनचा सुभेदार होता. मलिक अंबरच्या सैन्याशी झालेल्या बऱ्याच चकमकिंमध्ये त्याने सपाटून मार खाल्ला होता. ई.स.१६०५ ते ई.स.१६०८ या काळात मलिक अंबराने मुघलांच्या ताब्यातला बराच निजामशाही मुलुख परत जिंकून घेतला. जहांगीराला सवड मिळताच त्याने खान इ खानानला आग्र्याला बोलावून घेतले आणि त्याच्या मागणीनुसार त्याला १२००० घोडदळ आणि रुपये दहा लाख रोख देऊन त्याची परत दख्खनला पाठवणी केली. मुघलांच्या येणाऱ्या अफाट फौजेला तोंड द्यायला मलिक अंबराला आदिलशाह आणि कुतुबशाह यांची मदत लागणार होती. त्याप्रमाणे त्याने ती मिळवली. आदिलशाहने अंबराच्या मदतीला १०,००० घोडदळ पाठवले.
इकडे खान इ खानान मोठ्या फौजेनिशी येऊन तर पोहोचला पण त्याच्या सोबत पाठवलेल्या मनसबदारांवर त्याची पकड नव्हती. त्याने अंबरावर अचानक हल्ला करण्याचा बेत आखला. सुरुवातीला त्याला काही आघाड्यांवर यश मिळालं. पण काही काळातच अंबराने पुन्हा जोर धरला. त्याच्या सैन्यातील ‘चपळ मराठा घोडेस्वारांनी’ मुघल फौजेला सळो की पळो करून सोडलं. खान इ खानान च्या सैन्याला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. त्याने बादशाह कडे अजुन सैन्याची मागणी केली. ई. स. १६०९ मध्ये जहांगीरने शाहजादा परवेझला अजुन कुमक देऊन राजा मानसिंह आणि असफ खान यांच्या सोबत दख्खनला पाठवलं. या सैन्याने अहमदनगर कडे कूच केली. पण मराठा घोडेस्वारांच्या ताफ्यांनी गनिमी काव्याने लढून त्यांना हैराण करून सोडलं. अखेर मुघल सैन्याला माघारी परतावं लागलं. परवेझ ते सैन्य घेऊन बुऱ्हाणपूराकडे निघून गेला. मराठ्यांचं सैन्यच मुळात गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध होतं.
पराभवावर पराभव पत्करावा लागल्यामुळे मुघली सैन्यातला उत्साह विरून गेला होता. असफ खानाने बादशहाला स्वतः येऊन सैन्यात ऊर्जा आणण्याची विनंती केली. त्यावर जहांगीर विचार करू लागला. पण खानजहान लोदीने स्वतः जबाबदारी घेतली. खानजहान लोदी ही जहांगीर बादशहाची दरबारातील सगळ्यात जिवलग व्यक्ती. लोदी दख्खन कडे निघाला. सैन्यात दुफळी माजल्यामुळे खान इ खानानला जहांगिरने बोलावून घेतले आणि त्याच्याजागी ई. स. १६११ साली लोदीची नेमणूक केली. लोदीने महत्त्वपूर्ण यश संपादन करण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याच्या हातात काहीच लागलं नाही. मोगली सैन्यामध्ये स्थानिक लोकांचा अभाव होता. दक्षिणेतील मुलुख जिंकायचा तर तिथली इत्यंभूत माहिती असलेले लोक सैन्यात पाहिजेत. तिथल्या घाटांची ओळख असलेले, तिथल्या पहाडांशी, वळणांशी, नद्यांशी मैत्री असलेले लोक हवेत. त्याची मुघल सैन्यात कमतरता होती. याउलट अंबराच्या सैन्यात मराठ्यांचा प्रभाव वाढत होता. भोसले, जाधवराव, कायथ, उदाजीराम, यांसारख्या सेनानींचा भरणा हा निजामशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा अंग बनला होता. याच दरम्यान मलिक अंबराने आपली राजधानी जुन्नरहून देवगिरीला (दौलताबाद) हलवली.
आता जहांगीरने नवीन बेत आखला. अब्दुल्ला खान नावाचा गुजरातचा सुभेदार होता. त्याच्याबरोबर राजा रामदास आणि इतर सरदार देऊन त्याला नाशिक त्र्यंबकेश्वर कडून तर खानजहान लोदीला दक्षिण वऱ्हाड कडून, असा दोन आघाड्यांवर एकाच वेळी हल्ला करायचा आदेश दिला. दक्षिण वऱ्हाड म्हणजे माहूर बालाघाट. हा मुलुख तेव्हा निजामशाहीत होता. दोन्ही सैन्यांनी बादशहाच्या आज्ञेनुसार एकमेकांना आपल्या हालचालींबद्दल माहिती पुरवायची होती. अब्दुल्ला खानाने मेवाडमध्ये तलवार गाजवल्यामुळे त्याला ही कामगिरी देण्यात आली होती. पण उत्साहाच्या आणि गर्वाच्या भरात त्याने वऱ्हाडकडून येणाऱ्या आघाडीला न कळवता घाईघाईने कूच केली आणि घाट ओलांडून पलीकडे निजामशाही मुलुखात तो जाऊ लागला. मलिक अंबराने आदिल, कुतुब आणि बरिद यांच्याकडून सैन्य मागवले होते. नेहमीप्रमाणे ‘चपळ मराठा घोडेस्वारांचे’ ताफे मोगली सैन्यावर पाठवले. अब्दुल्ला खानाच्या सैन्याची संख्या जास्त असल्याने मलिक अंबराला मराठा सैन्याच्या साहाय्याने गनिमी कावा तंत्राने लढणे भाग होते . या ताफ्यांनी मुघली सैन्याला वेगवेगळ्या दिशांनी हल्ले करून, रोजच्या छोट्या छोट्या चकमकी घडवून, अचानक धाडी टाकून, लूट करीत हैराण करून सोडलं. रसद तोडून पुरवठा बंद पाडणे, झाडांमध्ये लपून बाणांचा वर्षाव करणे, रात्री आगीचे बाण सोडणे, अशा हल्ल्यांमुळे अब्दुल्ला खानाची फौज जेरीस आली. अंबराच्या सैन्याचे अब्दुल्ला सोबत एकही समोरासमोर युद्ध झाले नाही. पण खडकीला येईपर्यंत त्याच्या सैन्याची भरपूर हानी झाली होती. खडकिला आल्यावर अंबराच्या इतर सैन्याने त्याच्या सैन्यावर जोराचे हल्ले चढवले. मुघल सैन्य हल्ला रोखू शकले नाही. अब्दुल्ला बागलाणकडे पळून जाऊ लागला. पण त्याला जाताना वाटेत अंबराच्या मराठा सैन्याने लुटले. त्यांनी बागलाण पर्यंत त्याचा पाठलाग केला. वऱ्हाड मार्गाने येणाऱ्या सैन्याला अब्दुल्लाच्या झालेल्या अवस्थेची खबर मिळाली तेव्हा तेही परत माघारी फिरले. या सगळ्या विजयात मराठा सैनिकांचा सिंहाचा वाटा होता. ई. स.१६१२ मध्ये खडकी येथे झालेल्या या युद्धात मलिक अंबराच्या सैन्याची फत्ते झाली, म्हणून अंबराने खडकीचे नाव बदलून ‘फतहनगर’ ठेवले. पण ह्याच खडकीत त्याला त्याच्याच काही चूकांमुळे दारुण पराभव पत्करावा लागेल हे त्याला तरी काय माहीत होतं !
(पुढे वाचा “मराठ्यांचे महत्त्व २ : रोशनगांवची लढाई !”)
संदर्भ सूची :
१. ‘Malik Ambar’ By Jogindranath Chowdhury
२. Thesis submitted by Mohd. Siraj Anwar : Relations of The Mughal empire with The Ahmadnagar kingdom.
३. कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत
४. ‘Berar under the Mughals’ by Mohd. Yaseen Quddusi
©Copyrights reserved.
Comments
Post a Comment