राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ |
वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वतः राजे दत्ताजी आणि त्यांचे दोन मुलगे राजे रघोजी आणि राजे यशवंतराव हे धारातीर्थी पतन पावले. घरी केवळ पाच वर्षांचा धाकटा मुलगा राजे जगदेवराव एवढाच शिल्लक राहिला. ही घटना इ. स. १६६५ च्या सुमारास घडली. राजे जगदेवराव यांनी अगदी बालवयातच वाघीनगिरा हा किल्ला मोठ्या शौर्याने सर केल्यामुळे, बादशहा अलमगीर याची मर्जी प्रसन्न झाली आणि त्याला मनसब, तैनाती, जागिरी आणि खासगत वतन पूर्ववत चालू ठेवण्याबद्दल फर्मान काढले. राव जगदेव हे प्रथम सिंदखेडास राहात असत. त्यांनी तेथे तलाव, बागा, बारवा इत्यादी बांधून राज्याची व्यवस्था उत्तम ठेविली. प्रजा संतुष्ट ठेवून त्यांचीही भरभराट झाली. सिंदखेडच्या जाधव राजांमध्ये राव जगदेव हा विशेष कर्तबगार म्हणून प्रसिद्ध आहे. स्वतः शूर आणि कर्तबगार तर होताच; परंतु धार्मिक प्रवृत्तीचा असून भगवद्भक्त होता. सिंदखेडला बक्षी घराणे आहे. त्या घराण्यातील ४ पुरुषांनी जाधवांची बक्षीगिरी व दिवाणगिरी केली. त्या घराण्यातील एका पुरुषाने राव जगदेवराव यांची कैफियत सुमारे १०० - १२५ वर्षांपूर्वी लिहून ठेविली आहे. त्या कैफियतीत त्यांची दिनचर्या लिहून ठेवली आहे. त्या दिनचर्येवरून राव जगदेवांची धर्मश्रध्दा, भगवद्भक्ती, राज्याची सुव्यवस्था, न्यायबुद्धीने केलेले प्रजापालन व जाधव घराण्याचे तत्कालीन वैभव याचा चांगला बोध होतो. राजा जगदेवराव इ. स. १७०० मध्ये निवर्तले. या दिनचर्येवरून २५० वर्षापूर्वीच्या परिस्थितीचा बोध होतो. ती मूळ लेखकाच्या शब्दांतच दिली आहे. लेखनाचे हस्तदोष तेवढे दुरुस्त केले आहेत. ती दिनचर्या येणेप्रमाणे :
"नित्यक्रम दोन घटिका रात्रीं राजे जाधवराव याणी उठून गुरळा करून एका घटिका भगवत स्मरण, निर्गुण ध्यान करून उपरांतीक पांडवगीतेचे नामस्मरण शंभर श्लोक म्हणून, शउछ विधि, मुख प्रक्षाळण करून येके घटकेत श्नान करावे. देवपुज्या मुळे सिंदखेडकर यांनी करावी. कुलस्वामी देवी मातापुर व तुळजापूर व मार्तंड सातारे व जेजुरी याजला बेल, फुल, कुंकू, भंडार वहावा आणि बाळकृष्णा व व्यंकटेशचे मूर्तीस व माहादेव, स्फटिकाचे लिंग थोर, वहावा. देवमुळे सिंदखेडकर तेहि उपाधे प्रतिठित, त्याणी व्यासपीठावर बसोन पुराण दोन घटिका सांगावे. भारत पुराणे व उपपुराणे सर्व संग्रह सरकारात होता. पुराणानंतर गायक याणी सारंगी, वीणे इत्यादिक सरमजाम सहित गायेण करावे. त्यांत पुष्प वाहाणे व आर्ती नवेद पाकी. देवाची पूजा उत्तम होऊन गुरूमंत्र जेप व्हावे. बारा ब्राह्मणाचे तीर्थ बारा सी नित्य दान ध्यावें. नैमित्तक परवनी (णी) गोदान, दानधर्म, येथाविधी करावा. साहा घटकेत सर्व होऊन दरबारांत यावे.त्रिंबकराव शैव दिवान, खजानची व पेशकार व कारखाने जात, कारकुनानी श्नानसंध्या करून हाजीर व्हावे. विनाकारण उघडे आंगें दरबारात कोणी मुसदी याणी येऊ नये. आधी खजानजी याणी जमाखर्च रूजु करून जावें. पेशकार याणी जमाखर्च समजा (व) वा, रेणकोपंत कायदे व बक्षी तुकोजी बावदेव चौकीनवीस हाजरीवाले याणी फौजेची हजेरी, गणती देणे घेणे. उभयेतानी कागद समजाऊन जावे. फीलखाना व तोफखाना व सुतरखाना व पागेवाले व कोठीवाले व मुदबख याणी मुजरे करून नवविशेष वर्तमान श्रुत करून जावे. बारावे घटकेस भोजनास जावे प्रातःकाळी सिपाई लोक याचे येणेजाणे नाही. मुसदी व कारखानावाले याणी येत जावे. भोजनास स्वारी गेल्यावर, महादरोनीतुन विडा घेऊन कचेरीत यावे घटकाभर बसावे. जरूरीयात कोणी ते समई गोडगस्तीवाले वगैरे यावे. येकांत वर्तमान ऐकांवें दोप्रहरा निद्रा करावी. च्यार घटीका आराम जालियावर मग पागा, खासे घोडे पाहावे. ते समई पागे हवालदार वगैरे सर्वांनी हाजीर असावे. बारासे घोडे पागा होती. नामजाद निवडक चांगले घोडे, नंतर हाती कडे जावे. रामबकस हत्ती खासा आंबारीचा सरमजात आता उत्तम, पाखरी व झुली वगैरे व बलभीम हत्ती निशानाचा व नौबती व बसावयाचे वगैरे तीस बत्तीस हाती, उंट, सांडण्या सुमारे ११५.
साहा घटका दिवस राहिला म्हणजे दरबार आब (आम) व्हावा. सिलेदार, बारगीर् भले लोका पतकी व येक आंडे वगैरे याणी यावे. माहाली मुलकी लोकाचा वगैरे सर्व कारभार साहा घटका रात्र परियेंत होऊन दरबार बरखास्त करावा व भोजनास जावें. नंतर बारीक वर्तमान माहाली मुलकी आपले राज्यांत पदरचे कोण कसे हे सर्व ध्यानांत आणावें. तैनात पाऊन घरी खर्च जास्त असला तर त्यांजला आधीक तैनात करावी. कार्य प्रयोजन ज्याचे घरी असेल त्याचे योग्यतेसारखे सरकारांतून द्यावें. कदाचित कोणी जागा आसोन अशस्त्र खर्च करीत असला, चोरी, छिनाली याचे पुरुषास साफ उत्तर द्यावे जे, आमचे राज्यांत राहू नये. गुणेगारी कोणापासोन घेऊ नये. चोरटे मात्र आणिल्यास कैदेत घालून मारावे, लुटावे व वरकड मामलेदार, मुसदी व कारखाणेदार वगैरे याजला आन्याये जाल्यास सिक्षा चाकरीहून दूर करावे हेच, गुणेगारी वगैरे नाही. असे रीतीण चालवावें.
प्रहर रात्री जाली म्हणजे पंडित, वेदवादी, अध्यात्म, जाणते पुरुष प्राचीन आथवा कोणी नूतण आले तरी, देवघरात बसोण श्रवण, मनन च्यार घटका करावें. उपरांतील जातीणेच निवळ बसोन कवण करावें. स्वदस्तरू लेहून ठेवावं. दुसरे दिवसी सर्वांस दाखवून सुध असुध पाहावें. श्रीवेकंटेशजी कलीचा राजा चमत्कारिक दैवत, याचे ठायी भक्ति विशेष. असें तऱ्हेणे राज्य करीत चालले."
याप्रमाणे राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या लिहिली आहे. २५० वर्षापूर्वी राजे जगदेवराव यांच्या कारकीर्दीत सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा ही गावे किती वैभवसंपन्न होती हे या दिनचर्येवरून आणि या दोन्ही ठिकाणच्या अवशेषावरून दिसून येईल. दोन्ही ठिकाणचे भव्य महाल आज उध्वस्त झाले असून भोवतालच्या भिंती आणि प्रवेशद्वारे उभी आहेत. तीही नामशेष होण्याच्या मार्गात आहेत. या वैभवाचे धनी राव जगदेव यांच्या ७ व्या व ८ व्या पिढीचे वंशज अनुक्रमे राजे आनंदराव आणि राजे दत्ताजीराव यांचे दत्तकपुत्र हे आपला योगक्षेम कसा चालेल या विवेचनेत आहेत. हे उध्वस्त झालेले अवशेष पाहून व वरील वंशजांची आजची परिस्थिती पाहून "पूरा यंत्र स्रोतः" या श्लोकाची आठवण होते. आणि विषाद वाटून “कालाय तस्मै नमः" हे शब्द स्वयंस्फूर्त असे मुखातून निघतात.
लेखक : श्री. य. खु. देशपांडे
(यशोधन, श्री. य. खु. देशपांडे यांचे निवडक लेख )
संकलन : विनीत राजे
Bohot khub... 👍👌
ReplyDeleteNicely designed, written...good blog.
ReplyDeletevery nice
ReplyDelete