“माहूर येथील हत्तीखाना” |
मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले असावे. काही काळातच त्यांनी एका अमीरामार्फत दिल्ली गाठली. दिल्लीला त्यांचे मामा सरकारी दफ्तरात कामाला होते. त्यांच्या मदतीने उद्धवजींनी तिथे सरकारी दफ्तरात काम मिळवले. त्यांची कार्यकुशलता थेट बादशाह अकबराच्या कानावर गेली. त्याने उदाजींना काही कामगिरी दिली. ती उत्कृष्टपणे पार पाडून त्यांनी बादशहाची मर्जी संपादन केली. काही काळ दिल्लीतच गेला.
पुढे ई. स. १५९५-९६ मध्ये अकबराने वऱ्हाड आपल्या ताब्यात घेतले. त्यात माहूर हे एक अत्यंत महत्त्वाचे ठाणे होते. पण चाँद बिबीने तहाचा मान राखला नाही. आणि माहूर बालाघाट प्रांत मुघलांच्या हवाली करण्यास तिथले निजामशाही किल्लेदार विलंब करू लागले. याच काळात अकबराने उद्धवजींना माहूरच्या किल्ल्याची किल्लेदारी आणि वाशिमची जहागिरी दिली. मासिर उल उमर नुसार उद्धवजींनी आपल्या कर्तृत्वाने नांदेड जिल्ह्यातील माहुर ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पर्यन्त जहागिरी मिळवली होती. उद्धवजींचा जनसामान्यांवर चांगला पगडा होता असा उल्लेख मुघल कागदपत्रांमध्ये सापडतो. कदाचित याचा फायदा घेण्याचा उद्देश अकबराचा असावा. माहूरला त्यावेळी इंद्रजिव नावाचा राजपूत जमीनदार होता. तो लोकांस उपद्रव करित असे, असे ‘भक्तरहस्या’त कवीने म्हटले आहे. पुढे त्याची जहागिरी काढून टाकण्यात आली. अहमदनगरची निजामशाही आणि मुघल यांच्यात वऱ्हाडासाठी संघर्ष सुरू होता. त्यात माहूर कधी निजामशाही अंमलाखाली तर कधी मुघलांच्या अंमलाखाली असे. दक्षिण वऱ्हाडात अराजकता माजली होती. लुटालुट आणि जाळपोळ नेहमीचा प्रकार होता. ई. स. १६०० मध्ये चाँद बिबीचा खून झाला. निजामशाही मलिक अंबराच्या अधिपत्याखाली आली.* याच घटनेच्या मागेपुढे उद्धवजींनी मुघल नोकरी सोडून निजामशाहीत प्रवेश केला. हळू हळू उदाजीराम पंडित निजामशाहीचे चार हजारी मनसबदार झाले आणि एक महत्त्वपूर्ण सरदार म्हणून नावारूपास आले. त्यांच्या मुलखातल्या लोकांमध्ये त्यांना मान्यता होती. निजामशाहीतील बलाढ्य सरदार लखुजी जाधवराव यांच्याशी उदाजीराम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. जाधवराव आणि उदाजीराम यांच्यातील संबंधांवर पुढच्या काही भागांत प्रकाश पडेलच. पण वऱ्हाडच्या इतिहासात जे दोन महत्त्वपूर्ण सरदार झाले त्यात एक सिंदखेडचे राजे लखुजी जाधवराव आणि दुसरे माहुरचे राजे उदाराम हे होत. राजे उदाराम हे एक अत्यंत हुशार, कार्यकुशल, प्रजाहितदक्ष (पण मोगलांच्या मते कारस्थानी) सरदार होते. त्यांची एक उत्तम प्रशासक म्हणून ख्याती होती. दानधर्मामध्ये ते दख्खन मधील सरदारांच्या अग्रभागी असत. लखुजी जाधवरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बऱ्याच लढाया लढल्या आहेत. पैठण पासून मेहकर पर्यंत लखुजी जाधवरावांच्या तर मेहकर पासून माहूर पर्यंत उदाजीराम यांच्या जहागिरीचा मुलुख होता. असे जवळ जवळ अर्धे वऱ्हाड (दक्षिण वऱ्हाड) पुढे त्यांची जहागिरी होते. रायबागन ही राजे उदाराम यांचे सुपुत्र राजे जगजीवनराव यांची पत्नी. श्रीशिवभारतात उद्धवजी रामजींचा उल्लेख कवींद्र परमानंदांनी ‘उदारामश्चाग्रजन्मा ख्यातः क्षात्रेण कर्मणा’ म्हणजे ‘क्षात्रकर्मा मुळे प्रख्यात असा उदाराम ब्राह्मण’ असा केला आहे.
दख्खनच्या मुसलमानी राजवटींमध्ये मराठ्यांना महत्त्व प्राप्त होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मराठ्यांचे चपळ सैन्य. गनिमी कावा तंत्राचा वापर याच काळात मलिक अंबराने सुरू केला. मराठ्यांची त्याला युद्धांमध्ये मदत होत होती. याच कारणांमुळे भोसले,घाटगे, काटे, कायथ, चव्हाण, मोहिते, उदाराम, ई. सरदार १६ व्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि १७ व्या शतकाच्या सुरुवातीला उदयास येऊ लागले.
(*वाचा “मुघलांपूर्वीचे वऱ्हाड” वऱ्हाडनामा वर.)
संदर्भ सूची :
१. यशोधन - डॉ म. खु. देशपांडे यांचा निवडक लेख संग्रह, संपादक – प्रा. राम शेवाळकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई.
२. Maasir ul Umara
३. Berar Under the Mughals – Md. Yaaseen Quddusi
४. कवींद्र परमानंद कृत श्री. शिवभारत
© Copyrights reserved.
रायबागण देशमुख , राजे उदराम देशमुख यांचा इतिहास छान मांडला. दारव्हा भागात पण त्यांचे वाडे होते अस मी वाचलं होतं. त्या भागावर पण प्रकाश टाकावा तुम्ही. पूर्ण ब्लॉग वाचून काढले. मस्त आहेत विदर्भावर चे. सातारच्या गादी साठी प्रतापसिंह राजे भोसले यांच्यासाठी रंगो बापुजी गुप्ते यांची समाधी आहे त्याला बैरागी बाबाचा मठ म्हणतात. नुकताच बघुन आलोय.आणि नागापूरकर भोसले म्हंजे साबाजी भोसले यांचा वाडा पण दर्व्ह्यात आहे. जमलं तर भेट द्या. सुंदर लिखाण विनीत राजे.मी विदर्भाचा असल्यामुळे शामा कोलम पर्यंत सगळं वाचून काढलं 😊🙏
ReplyDeleteसरदार रंगो बापुजी गुप्ते यांचा ब्रिटिश सरकार विरुद्ध चा लढा देत ईथ पर्यंत प्रवास झालं . बैरागी वेशात इथे राहत असल्यामुळे बैरागी मठ नाव पडले
ReplyDelete