माहूर येथील किल्ल्याचा हत्ती दरवाजा |
ई. स.१६१२ मध्ये अंबराने आपली राजधानी देवगिरीहून खडकीला हलवली. मलिक अंबराच्या सैन्याकडून अनेकदा पराभूत झाल्यानंतर मोगलांना अंबराची खरी ताकद कळू लागली होती. याच दरम्यान मलिक अंबर आणि मराठा सरदारांच्या एका गटामध्ये मतभेद उत्पन्न होऊ लागले होते. लखुजी जाधवराव आणि उदाजीराम हे त्यात मुख्य होते. त्यांच्यात नेमके काय मतभेद होते, हे ज्ञात नाही. पण याचा बराच फायदा मोगलांना झाला, हे मात्र निश्चित. पराजयाची मालिका कशी थांबवावी या पेचात असताना जहांगीर बादशहाने पुन्हा खान इ खानानला दख्खनचा सुभेदार नेमलं. खान इ खानान मोगलांमध्ये दख्खनचा जाणता होता. त्याच्या तीन मुलांना मनसबदारी आणि बक्षिसे देऊन त्याला मलिक अंबराचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. बाळापूर येथे मोगली सैन्याचा तळ पडला. आधीचे पराभव तो विसरला नव्हता. आता त्याने शांततापूर्ण पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. पूर्वीप्रमाणेच मोगली सरदारांमध्ये आपसांत मतभेद, द्वेष ई. कायम होते. त्याने हळूहळू ही डोकेदुखी कमी केली. एक एक करून सरदार मरू लागले. आपल्या विरोधकांना संपवल्यावर आता खान इ खानान मलिक अंबराशी लढण्याचा बेत आखु लागला.
इकडे मलिक अंबर आणि जाधवराव – उदाजीराम गट यांच्यातील मतभेद टोकाला गेले. काही काळ असाच शीतयुद्धात गेला. आणि ई. स.१६१४ मध्ये खान इ खानानचे नशीब स्वतः त्याच्याकडे चालून आले. जाधवराव, उदाजीराम आणि बाबाजी कायथ हे तीन महत्त्वपूर्ण मराठा सरदार निजामशाही चाकरी सोडून मोगलांना जाऊन मिळाले. बाळापूर येथे येऊन त्यांनी खान इ खानानचा मुलगा शाहनवाझ खान याची भेट घेतली. तिनही सरदारांचे जंगी स्वागत झाले. त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे त्यांना मनसब आणि एक एक हत्ती देण्यात आला. मलिक अंबराप्रमाणेच आता मोगली फौजांकडे ‘मराठ्यांचे चपळ घोडदळ’ आले होते. मोगलांची ताकद वाढली. आता खान इ खानान आपला बेत आखु लागला.
आपली ताकद कमी झाल्याचा अंदाज मलिक अंबराला आला होता. त्याने आदिल, कुतुब, बरीद या शाह्यांसोबत पुन्हा हातमिळवणी केली. या वेळेला आदिलशहाने २०,००० तर कुतुबशाह ने ५,००० घोडदळ अंबराच्या मदतीला पाठवले. असे ४०,००० सैन्य घेऊन मलिक अंबर खडकी येथे थांबला. तर १५,००० घोडेस्वारांच्या छोट्या छोट्या तुकड्या त्याने येणाऱ्या फौजांवर मारा करण्यासाठी पुढे पाठवल्या. मोगल फौजा जालन्याच्या पुढे आल्यानंतर ह्या तुकड्यांनी त्यांच्यावर हल्ले सुरू केले. गनिमी कावा तंत्राने मोगली फौजेला हैराण करून सोडणे हा त्यांचा उद्देश होता. पण यावेळी मोगलांसोबत मराठा फौज असल्यामुळे त्यांना या फौजेला तोंड देणे सोपे गेले असावे. अंबराच्या या छोट्या तुकड्यांचा मारा परतवून लावण्यात मोगलांना यश मिळाले आणि मोगली सैन्य रोशनगांव पर्यंत आपल्या सर्व शक्तिनिशी येऊन पोहोचले. मलिक अंबराने आपल्या सैन्याच्या पराभवाची बातमी ऐकली आणि तो स्वतः फौज घेऊन रोशनगांव कडे निघाला. रोशनगांव येथे दोन सैन्य समोरासमोर आली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास युद्धाला सुरुवात झाली. बराच वेळ ही लढाई रोशनगांवला सुरू होती. अचानक मोगली फौजांच्या एका तुकडीने मलिक अंबराच्या मुख्य तुकडीवर जोराचा हल्ला चढवला. ह्या माऱ्यामुळे मलिक अंबराचं सैन्य बिथरलं. ही लढाई पुढे दोन तास चालली. शेवटी अंबराचा पराभव झाला. आणि मलिक अंबर पळून जाऊ लागला. मोगली सैन्याने त्याचा पुढे दोन तीन कोस पाठलाग केला पण, अंधार पडल्यामुळे त्यांना पुढे जाणे जमले नाही. भरपूर लूट घेऊन मोगल सैन्य परतले. आणि त्यांनी खडकीकडे कुच केली. या युद्धात अंबराच्या सोबतच आदिल, कुतुब यांचंही खूप नुकसान झालं. त्यांनी आपल्या फौजांना परत बोलावून घेतलं. अंबराच्या पराभवाच्या बातमीमुळे खडकी निर्मनुष्य झालं होतं. दुसऱ्या दिवशी मुघल फौजा तिथे पोहोचल्या, काही दिवस तिथे राहिल्या, आणि शहरात नासधूस करून जाळपोळ करून रोहनखेड खिंडीतून¹ परत निघून गेल्या. हा अंबराचा मोठा असा पहिलाच पराभव होता. ई. स. १६१६ च्या फेब्रुवारी महिन्यात झालेली ही लढाई ‘रोशनगांवची लढाई’ अथवा ‘खडकीची लढाई’ म्हणून प्रसिद्ध आहे. याचा मुख्य तपशील मोगली कागदपत्रांमध्ये आढळतो. पण मोगलांच्या कागदपत्रांचं एक वैशिष्ट्य आहे. त्यात मराठ्यांच्या कारवायांची कणभरही माहिती मिळत नाही. पण अंबराच्या सैन्यातून जाधवराव सारखे बलाढ्य सरदार निघून गेल्यावर त्याची शक्ती खच्ची झाली आणि त्यामुळे तो हे युद्ध हरला यात काही वाद नाही. त्याच्या छोट्या गनिमी कावा तुकड्यांच्या माऱ्यांचा या वेळेला मोगलांवर काही परिणाम झाला नाही, याचे कारण यावेळी मोगलांकडे त्यांना तोंड द्यायला मराठी सैन्य होते. मराठ्यांचे ह्या लढायांमध्ये किती महत्त्वाचे योगदान आहे याचा प्रत्यय येतो तो पुढे अंबराने उचललेल्या पावलांवरून !
या पराभवातून लगेच सावरून मलिक अंबराने काही चुका दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. निघून गेलेल्या आपल्या सरदारांना परत बोलावण्याचा त्याने प्रयत्न चालवला. यासाठी त्याने आदिलशाहची मदत घेतली. बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि आणि आदिलशाहच्या मध्यस्थीने ई. स. १६१७ मध्ये म्हणजे पराभवाच्या वर्षभरातच त्याने आपल्या तिनही सरदारांची मने जिंकून त्यांना परत निजामशाही सेवेत आणण्यात यश मिळवले. राजे लखुजी जाधवराव, राजे उदाजीराम आणि बाबाजी कायथ या तिन्ही सरदारांनी मोगलांची चाकरी सोडून पुनः निजामशाहीत प्रवेश केला. पण मलिक अंबराचे यांच्याशी असलेले व्यवहार मैत्रीपूर्ण नसावेत. याचाच परिणाम म्हणूनच काही दिवसांत पुन्हा या सरदारांमध्ये आणि मलिक अंबरामध्ये मतभेद निर्माण झाले. जाधवरावांना गमावणे मलिकाला परवडणारे नसल्यामुळे कसेबसे त्याने जाधवरावांची मर्जी राखली. पण उदाजीराम आणि बाबाजी कायथ यांच्याशी त्याचे संबंध दिवसेंदिवस वाईट होऊ लागले. त्याचा परिणाम म्हणून यांच्या आपसांतच चकमकी घडू लागल्या. मलिक अंबराने या मराठा सरदारांना अनुकूल असलेल्या आदम खानला देवगिरी किल्ल्यात कैदेत टाकले. काही दिवसांतच त्याची हत्या करण्यात आली. बाबाजी कायथचा एक चाकर फितूर करवून त्याचीही हत्या मलिक अंबरने करवली. आता राहिले होते राजे उदाजीराम. उदाजीराम वर त्याने सैन्य पाठवले. उदाजीराम आणि मलिक अंबर यांच्या सैन्यात लढाई झाली. उदाजीराम यांनी जोरदार प्रतिकार केला आणि मलिक अंबराच्या सैन्याचा पराभव झाला. ही लढाई माहूर परिसरात झाली असावी. अंबराचे सैन्य परतवून लावल्यावर उदाजीराम यांनी काही काळ निजामशाही मुलखातच काढला. पण पावलोपावली धोका होता. पुढे त्यांनी आदिलशहाशी पत्रव्यवहार केला. आदिलशाही दरवाजे उदाजीराम साठी बंद झालेले होते. मग काही काळ असाच गेला आणि ते मोगलांना जाऊन मिळाले. मलिक अंबराचा दुर्व्यवहार पुढे चारच वर्षांत जाधवरावांनाही मोगलांकडे घेऊन आला.
***
1. “Rohankhed,a village situated a few miles north of Buldana, seems to have held in Berar informer days relatively the position held by Panipat in Northern India .It was a town situated on the high road from north to south, commanding the ascent to the Balaghat or the table-land of Southern Berar.”(Historical Land-marks of the Deccan by Major T.W.Haig p.162).
संदर्भ सूची :
१. ‘Malik Ambar’ By Jogindranath Chowdhury
२. Thesis submitted by Mohd. Siraj Anwar : Relations of The Mughal empire with The Ahmadnagar kingdom.
३. कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत
४. ‘Berar under the Mughals’ by Mohd. Yaseen Quddusi
५. ‘Historical Land-marks of the Deccan’ by Major T.W.Haig
©Copyrights reserved.
Comments
Post a Comment