नरनाळा किल्ला |
ई. स. १६२१ मध्ये दक्षिणेत विजय मिळवून आलेल्या आपल्या मुलाला - खुर्रमला - जहाँगीर बादशहाने शहाजहान हा खीताब दिला तेव्हा त्याला आपल्याच घरात निर्माण होणाऱ्या यादवीची कल्पना देखील नसेल. काहीच वर्षे आधी मलिक अंबराचा पराभव करून आलेल्या आणि निजामाचा दरबार सोडून आलेल्या मराठा सरदारांवर आपण जो कृपेचा वर्षाव केला, त्याची परतफेड आपल्याच विरोधातील उठावाला सहाय्य करून हे कपटी मराठे करतील, याचाही त्याने कधी विचार केला नसेल. १६२१ च्या मध्यापासूनच जहाँगीराची पत्नी नुर जहान शहाजहान विरुद्ध राजकारण खेळू लागली होती. त्याची भिती डोक्यात शिरल्यामुळेच शहाजहान ने बंड करण्याचा निर्णय घेतला. त्याचा उत्तरेतील जहागिरीचा मुलुख कमी करून तेवढ्याच जहागिरीचा मुलुख त्याला दख्खन मध्ये देण्यात आला, कंदाहरकडे जाण्याची आज्ञा दिली गेली आणि त्याने तिकडे जाण्यास नकार दिल्यावर जेव्हा वारंवार त्याच्याकडे कंदाहरच्या स्वारीसाठी सैन्य पाठवून देण्याची मागणी होऊ लागली, तेव्हा त्याने बंडाचा झेंडा उभारला. त्या बंडात त्याला दक्षिणेतील सरदारांचे सहाय्य होते. त्यात दोनच मराठा सरदारांचा उल्लेख येतो. एक, राजे लखुजी जाधवराव आणि दुसरे, राजे उदाराम. त्याचबरोबर राजा बिक्रमजीत सारखे मातब्बर राजपूत सरदार देखील त्याच्या मदतीला होते.
शहाजहानचे बंड ई. स. १६२३ ते १६२६ असे तीन साडे तीन वर्षे चालले. पण त्यात त्याला मराठ्यांचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. बंडाच्या सुरुवातीच्या काळातच हे दोनही सरदार त्याला सोडून परत बादशहासमोर हजर झाले. कंदाहार कडे जाण्याचे आदेश मिळाले तेव्हा शहाजहान बुऱ्हाणपूर येथे होता. दख्खन मध्ये त्याचे चांगले वर्चस्व प्रस्थापित झाले होते. ई. स. १६२३ च्या फेब्रुवारी महिन्यात शहाजहानने अधिकृतरित्या बंड उभारले. काही दिवस वाटाघाटी करण्याचे प्रयत्न झाले, आणि दोन सैन्यांमध्ये पहिली चकमक फतेहपुर सिकरी येथे घडली. काही दिवसात आसपासच्या प्रदेशात अनेक लढाया झाल्या. त्यातील एका लढाईत मराठा चपळ सैन्याचा उल्लेख आढळतो. महाबत खानाच्या सैन्याची एक तुकडी मन्सूर खानाच्या हाताखाली होती. नशेत धुंद असलेल्या मन्सूर खानाला मराठा सैन्याने मूळ सैन्यापासून वेगळं पाडून त्याच्या तुकडीचे लचके तोडले आणि त्याला हैराण करून सोडलं. पण महाबत खानाच्या सावधानतेमुळे आणि समयतत्परतेमुळे त्याच्या सैन्याची बरीच हानी टळली.
ई. स. १६२३च्या मे महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाबतखानाने शहाजहानच्या सैन्याला पळता भुई थोडी केली, आणि त्याला दक्षिणेत पळवून लावले. पाऊस सुरू झाला आणि अस्मानी सुलतानी संकटं झेलत शहाजहान वऱ्हाड प्रांताच्या शेवटच्या टोकाला, म्हणजे माहूरला येऊन पोहोचला. तेव्हा त्याच्यासोबत त्याची पत्नी मुमताज आणि मुले दारा व औरंगझेब हेही होते. औरंगझेब तेव्हा ६ वर्षांचा होता. माहूर येथे राहून काही काळ महाबतखानाच्या सैन्याचा मुकाबला करावा असा विचार त्याच्या मनात होता. पण ‘युद्ध इथे झाले तर आपल्या मुलखातील सामान्य लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून आपण इथून पुढे युद्धात सहाय्य करू इच्छित नाही’ असा स्पष्ट संकेत उदारामाने दिल्यामुळे त्याला तसे करणे शक्य झाले नाही. शहाजहानने आपले सैन्य उदारामाचे हवाली केले आणि तो गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडे निघून गेला. त्या सैन्यात जवळपास ३०० हत्ती होते. इकडे जाधवराव उरलेसुरले सैन्य घेऊन सिंदखेडला आले. आणि काही काळातच दोन्ही सरदारांनी बुऱ्हाणपूर जवळ केले. मुघल सैन्य शहजादा परवेजच्या हवाली करून दोघेही जहाँगीर बादशहासमोर हजर झाले. अर्थातच दख्खन मध्ये या सरदारांची गरज मुघलांना पडणार होती. पण या दोन्ही सरदारांवर बादशहाला आता भरवसा राहिला नव्हता. त्यामुळे जाधवरावांचा मुलगा आणि उदारामाचा भाऊ यांना त्याने ओलीस ठेऊन घेतले. आणि दोघांनाही परत बालाघाट येथे पाठवून दिले.
मासिर-उल-उमर मध्ये व अन्य मुघल कागदपत्रांमध्ये लखुजींचा उल्लेख ‘उलट्या काळजाचा’ आणि उदारामाचा उल्लेख ‘कपटी आणि कट-कारस्थानी’ असा केला जातो, त्याचे कारण हेच असावे. हे दोन्ही सरदार कोणाचे सगे नव्हते, तर स्वतंत्र वृत्तीचे होते, असे दिसते. ई. स. १६१६ साली निजामशाही सोडून दोन्ही सरदारांनी मोगल तंबू जवळ केला, मलिक अंबरने मनधरणी केल्यावर पुन्हा निजामशाही मनसबदारी स्वीकारली, मतभेद संपत नाहीत म्हणून उदारामाने पुन्हा मुघल छावणी जवळ केली, १६२१ साली लखुजींनी पुन्हा निजामशाही सोडून मोगल दरबारात हजेरी लावली, ह्या सगळ्या घटनांमधून त्यांच्या स्वतंत्र वृत्तीची प्रचिती येते. ह्या वृत्तीची छाप निश्चितच माँसाहेब जिजाऊंवर पडली असेल. दोन्ही सरदारांचे नाव इतिहासाच्या पानांत सोबतच घेतले जाते. त्यांच्या जवळजवळ सगळ्याच मुख्य मोहिमा त्यांनी सोबत राबविल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते, असे म्हणायला हरकत नाही. मराठ्यांच्या उदयाची पहिली पायरी म्हणजे सरदार लखुजी जाधवराव, तर दुसरी पायरी म्हणजे उदाराम, बाबाजी कायथ, यांसारखे सरदार होत.
या सरदारांना बळ येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मनसबदारी पद्धत होय. मनसबदारांना तीन हजार, पाच हजार असे सैन्य देण्यात येई. त्यात पहिल्या श्रेणीच्या मनसबदाराला जेवढे पायदळ तेवढेच घोडदळ देण्यात येई. उदा. पहिल्या श्रेणीच्या पाच हजारी मनसबदाराकडे पाच हजार घोडदळ आणि पाच हजार पायदळ असे. सरदाराला मनसब म्हणजे पगार देण्यात येई, ज्यातूनच त्याला त्याच्या सैनिकांना पगार द्यावा लागत असे. पुन्हा मनसबदाराच्या रोख पगाराला पर्याय म्हणून जहागिरीचा मुलुख काढून देण्यात येई. त्यामुळे तेवढ्या प्रदेशात त्याचाच अंमल असे. आलेल्या शेतसाऱ्यातून सैनिकांचे पगार केले जात. सरदार आपल्याला पगार देणार असल्यामुळे प्रत्येक सैनिकाची निष्ठा बादशहाच्या ठायी नसून मनसबदाराच्या ठायी असे. अनेक सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षात सामील झाले नाहीत, त्याचे कारणही या मनसबदारी पद्धतीतच असावे. महाराजांनी ही पद्धती बंद केल्यामुळे, आपले स्वातंत्र्य आणि महत्त्व हिरावून जाण्याची भिती त्यांना वाटली असावी. आपले वैयक्तिक स्वातंत्र्य त्यांना अखिल हिंदू समाजाच्या स्वातंत्र्यापेक्षा मोठे वाटले असावे. किंवा त्यांना पारतंत्र्याची कदाचित जाणीवही झालेली नसावी.
सोळाव्या शतकाच्या शेवटी लखुजी जाधवराव याच मराठा सरदाराचे नाव इतिहासाला माहिती असले तरी ई. स. १६१६ पर्यंत काही मराठा घरण्यांना महत्त्व प्राप्त झाले होते. पुढे अनेक मराठा सरदार उदयास आले. गनिमी कावा युद्धतंत्रात मराठ्यांनी दख्खनी शाह्यांना आणि मोगलांना भरपूर मदत केली. पुढे काही वर्षातच या मराठा शिपायांना एकत्र करून महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा जरीपटका आसमंतात फडकावला !
पुढील भागात वाचा –
“पहिला पराभव : भातवडीचे युद्ध ”
संदर्भ सूची :
१. मासिर- उल्- उमर
२. Berar Under the Mughals by Dr. Mohd. Yaseen Quddusi
३. Tuzuk - I – jahangiri
४. History of Jahangir by Beni Prasad
५. कवींद्र परमानंद कृत श्रीशिवभारत
६. Malik Ambar by Jogindranath Chowdhury
७. मराठी रियासत : गो स सरदेसाई
८. THE RELATIONS OF THE MUGHAL EMPIRE WITH THE AHMADNAGAR KINGDOM (1526-1636) A thesis by Mohd. Siraj Anwar
९. श्रीराजाशिवछत्रपती : ब. मो. पुरंदरे
१०. शिवाजी निबंधावली खंड १
© Vinit Raje
Your writing skills always impressed me
ReplyDeleteKeep reading.. Keep loving.. Thank you.🙏😇
Delete