(१९४७ साली ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. य. खू. देशपांडे यांनी सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. तेव्हा त्यांनी “जाधवांचिये नगरी” या आपल्या लेखात सिंदखेड येथील ऐतिहासिक वास्तूंची माहिती आणि परिस्थिती लिहून ठेवलेली आहे. त्याच लेखातील निवडक भाग खाली देत आहे. सदर लेखात दिलेल्या सिंदखेडच्या परिस्थितीत आजही विशेष काही बदल झालेला नाही. रंगमहाल आणि निळकंठेश्र्वर मंदिर (प्राचीन) ह्या वस्तू अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. नीळकंठेश्र्वर मंदिराच्या परिसरात दारूच्या फुटलेल्या बाटल्या बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या आत जंगली गवत उगवल्याचे लक्षात येते. आसपासच्या भागात अनेक देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती ऊन वारा पाऊस यांचा मार खाण्यासाठी सोडून दिलेल्या आढळतात.)
जाधवांचिये नगरी :
लखुजी जाधवांना शिंदखेडची देशमुखी मिळाल्यानंतरचे अनेक अवशेष सिंदखेड येथे आणि देऊळगावराजा येथे आहेत. शिंदखेडास सिद्धक्षेत्र म्हणत असत, असे गोसावीनंदन यांच्या ज्ञानमोदक ग्रंथावरून दिसते. क्षेत्र म्हणून अद्यापही त्याची प्रसिद्धी आहे. लखुजी जाधवांच्याही अगोदरचे अवशेष म्हणजे नीळकंठेश्वर महादेवाचे मंदिर आणि त्या समोरील दगडी बांधणीची पण आता पाहिऱ्या विस्कळीत झालेली पुष्करणी हे होत. त्याचप्रमाणे दंतकथेप्रमाणे शरभंग ऋषीचा आश्रम अथवा श्रीरामनिर्मित विस्तीर्ण पण आता अगदी गाळलेला जलाशय आणि श्रीरामाने स्थापिलेले रामेश्वरलिंग व त्यावरील दगडी मंदिर हेही प्राचीनच आहेत. लखुजीने मुळे यांना दिलेल्या पत्राच्या नकलेचा जो वर उल्लेख केला आहे, त्यामध्ये श्री. नीळकंठेश्वर आणि श्रीरामेश्वर या देवतांची शपथ नमूद आहे. नीळकंठेश्वरांच्या मंदिरात आणि पुष्करणीच्या भिंतीत शेषशायी इत्यादी देवतांच्या प्राचीन मूर्ती दिसून येतात. जाधवांच्या अमदानीतील शिंदखेड येथील अवशेष म्हणजे जाधवांच्या दगडी महालाभोवतालचा विस्तीर्ण दगडी कोट व त्याचे प्रवेशद्वार आणि त्या दारावरील भव्य दिवाणखाना, दगडी महालातील उद्धस्त अशी विस्तीर्ण तळघरे, व दगडी महालाशेजारील लाकडी महालाचे भग्नावशेष, नीळकंठेश्वराच्या बाजूस असलेला रंगपंचमीचा महाल, लखुजी जाधव आणि त्यांचे पुत्र, नातु यांच्या समाधीचे हल्ली घुमट नावाने ओळखले जाणारे विस्तीर्ण दगडी समाधिमंदिर व जाधव घराण्यांतील समाधी; वासुदेवसा, मुरारसा, नवलसा इत्यादी प्रसिद्ध पुरुष होऊन गेलेल्या आणि जाधवांशी संबंध असलेल्या सावजी घराण्याचा प्रासादतुल्य पण आता पडलेला सावकारवाडा, एके काळी विस्तीर्ण वाडे असलेला पण आता उद्ध्वस्त असा देशपांडे मंडळीचा वेटाळ, जाधवांचे एके काळी फडणीस असलेल्या घराण्याच्या विस्तीर्ण वाड्याचे भग्नावशेष, एके काळी प्रेक्षणीय असलेला कासाराचा वाडा इत्यादी इमारतींचे अवशेष अद्यापही पूर्व वैभवाची साक्ष देतात. पिण्याच्या पाण्याकरिता आणि बागायतीस उपयोग व्हावा म्हणून शिंदखेडात जाधवांनी फार मोठ्या प्रमाणावर बारव, तळी आणि विहिरी निर्माण केल्या आहेत. एकाच वेळी बारा मोटा चालविता येतील अशी बाळसमुद्रविहीर, एकाच वेळी २४ मोटा चालविता येतील अशी विस्तृत गंगासागर विहीर, नारळमळ्याची बारव, सजनाबाईची विहीर, कालवें काढून बागाईतास पाणी देण्याकरिता मजबूत दगडी धरण बांधून आत पाणी साठविण्याकरिता मोठमोठे नाले खोदून तयार केलेला मोठा तलाव, धरणांतच सात मजली विहीर बांधून पाणी सोडण्याकरिता केलेली कुशल योजना हे तत्कालीन स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. वरील पद्धतीप्रमाणेच धरण बांधून जलविहाराकरिता तयार केलेला चांदणी तलाव व त्यांत पूर्ण व अपूर्ण अशी जलमंदिरे, ही जाधवांच्या वास्तुविषयक आवडीचे द्योतक आहेत. मोठ्या महालासमोर आणि इतरत्र दृष्टीस पडणारे उच्छ्वास, त्यांनी पाण्याचे नळ बांधून पाणी आणण्याचा प्रयत्न केला होता हे दर्शवितात. राव जगदेव यांनी काळ्या दगडांनी बांधलेला विस्तीर्ण प्राकार, आंतील इमारती व प्रवेशद्वार न बांधताच अर्धवट स्थितीत सोडून दिलेला दृष्टीस पडतो. या कोटास हल्ली दगडाच्या रंगावरून काळा कोट असे म्हणतात. वरील सर्व अवशेष एके काळी हे किती वैभवसंपन्न शहर होते, याची चांगली साक्ष देतात.
सिंदखेड येथील प्राचीन मूर्ती |
राव जगदेव जाधव यांच्या अमदानीतच पूर्वी देवळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावास भरभराटीस आणून देऊळगाव या नावाचे तेथे वस्ती केली व जाधवांचे गाव म्हणून या गावास देऊळगावराजा म्हणून हल्ली ओळखण्यात येते. येथेही जाधवांनी केलेल्या बांधकामाचे अवशेष आज दृष्टीस पडतात. महत्त्वाचे स्थळ म्हणजे तेथील गढी व आतील जाधवांचा महाल, गढीच्या अर्ध्या दगडी भिंती व दगडी भव्य प्रवेशद्वार व आतील महालाचे प्रवेशद्वार येवढेच काय ते शिल्लक आहे. आतील महाल नष्ट झाला असून त्याची जोती मात्र कायम आहेत. जाधव घराण्यातील वतनासंबंधी कोर्ट कचेरीच्या खर्चामुळे ही गढी विकण्यात आली आहे व राहिलेला भागही दगडमातीकरिता नाहीसा होण्याचा संभव आहे. खरेदीदारांकडून अवशिष्ट असलेला भाग विकत घेऊन जाधवांचे स्मारक म्हणून तो कायम ठेवून नगरमंदिर अथवा शाळा अशा स्वरूपाचे सार्वजनिक मंदिर तेथे करण्यात यावे, असा तेथील मंडळींचा विचार आहे. देऊळगाव येथेही मोठ्या बागेतील विहीर, विस्तीर्ण अशी खारीबाव, वगैरे मोठमोठ्या विहीरी आहेत. मोठ्या बागेतच जाधवांच्या समाधी असून मोतीसमाध म्हणून छोटीच पण उत्कृष्ट कलाकुसरीची घडीव दगडांची समाधी आहे. देऊळगाव येथील विशेष उल्लेखनीय असे जाधवांचे संबंध असलेले स्थळ म्हणजे बालाजीचे देऊळ होय. देऊळगाव हे बालाजीच्या यात्रेकरिता प्रसिद्ध आहे. बालाजीच्या आणि लक्ष्मीच्या मूर्ती धातूच्या अगदी लहान अशा आहेत. बरेच दिवस या बालाजीचे संस्थानची व्यवस्था वर निर्दिष्ट केलेल्या साबळे घराण्याकडे होती. मूर्ती स्थापन झाल्यापासून त्याना सार्वजनिक स्वरूप आले आहे.
या संस्थानास जमीन वगैरे इनाम नाही. पूर्वी शिंदे, होळकर इत्यादिकांकडून देणग्या असत, पण नवरात्राच्या यात्रेत कानगी रुपाने लाख दीड लाख रुपये उत्पन्न होत असे. यंदाही ५६ हजार रुपये कानगी रूपाने आल्याचे समजते. या देवस्थानाच्या वहिवाटीबद्दल बरीच वर्षे कोर्टात झगडे सुरू होते. हल्ली सुमारे २५ वर्षापासून कोर्टाच्या हुकुमाने संस्थान सार्वजनिक ठरून जाधवराव राजे हे वंशपरंपरा ट्रस्टी मुक्रर करण्यात आले व ह्यांच्या मार्फतच देवस्थानाची वहिवाट सुरू आहे. हल्लीचे विश्वस्त राजे आनंदराव जाधव असून त्यांच्यातर्फे व्यवस्थापक नेमलेला आहे. या देवस्थानात अनेक जडजवाहिरांचे दागिने आहेत, त्यात एक हार आहे, त्याच्या पदकावर बाजीराव पेशव्यांचे (दुसरा बाजीराव) नाव आहे. या संस्थानच्याही, देवांचा वाडा, पाकशाळा, धर्मशाळा कार्यालय इत्यादी इमारती बांधलेल्या आहेत व धर्मशाळेसमोरच एक मोठी वेस आहे. देऊळगावराजालाही पूर्वी गावकुस होता, त्याच्या हल्लीही काही वेशी विद्यमान आहेत.
जाधव घराण्यात हल्ली फक्त २७-२८ महालांची देशमुखी आहे. नगर, नाशिक जिल्हा व मोंगलाईतील महालांची देशमुखी हल्ली राजे आनंदराव जाधवराव यांच्या नावे असून, त्यांना त्यांचा वसूल मिळतो. शिंदखेड येथील देशमुखी राजे दत्ताजीराव जाधवराव यांच्याकडे असून त्यांना आणखीही काही हक्क आहेत. सन १८५२ साली राजे पहिले बाजीराव जाधवराव यांचा अरबाशी इंग्रजांच्या कॉन्टिजंट फौजेचा औरंगाबाद येथे झगडा झाला; त्यात दोन युरोपीयन अधिकारी मारले गेले, त्याचा आरोप बाजीराव जाधवराव यांच्यावर येऊन त्याना दौलताबादच्या किल्ल्यात बंदिवास घडला व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. आरोप आला त्याच वेळी त्यांच्या नांवाने असलेली जहागीर, इनामे वगरे जप्त करण्यांत आली. तेव्हापासून घराण्यांत जहागीर, इनाम वगैरे राहिली नाहीत.
लखुजी जाधव आणि त्यांचे बंधू भूताजी ऊर्फ जगदेवराव यांचा विशेषतः लखुजीचा वंशविस्तार फार मोठा आहे. हल्ली सुद्धा त्यांच्या शाखा वऱ्हाडात देऊळगावराजा, अडगाव राजा आणि मोगलाईत फुलंब्री, मेहुण इत्यादी ठिकाणी विद्यमान आहेत. परंतु हल्ली त्यांची स्थिती अगदीच सामान्य अतएव करूण अशी झाली आहे. राजे आनंदराव जाधवराव यांना एकट्या निजाम सरकारकडून २४ हजारांच्या वर वार्षिक वसूल मिळतो. ते राजे हल्ली बहुधा इंदूर येथे राहत असतात.
जाधव घराण्याशी पिढ्यान्पिढ्या संबंध असलेली अनेक घराणी सिंदखेड, देऊळगावराजा, चिखली इत्यादी गावी आता विद्यमान आहेत. याशिवाय जाधवांच्या घराण्याच्या अनेक शाखा निरनिराळ्या ठिकाणी वास करीत आहेत. या सर्वांच्याकडे जाधव घराण्यांचे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे कागदपत्र असण्याचा संभव आहे व माझे तेथे थोडा काल वास्तव्य झाले, त्यावरून तसे मला आढळून आले आहे. सबंध घराण्यापैकी प्रमुख घराणी म्हणजे सावजी या नावाचे सिंदखेड येथील सावकार घराणे. या घराण्याकडे देऊळगावराजा येथील बालाजी संस्थानाची व्यवस्था होती. हल्लीचे या घराण्याचे प्रतिनिधी म्हणजे श्री. हरीसा ऊर्फ नाना मास्तर त्यांचे चिरंजीव श्री. मदनसा हे चिखलीस वकिली करीत असल्यामुळे तेथेच राहतात. यांच्याकडील कागद मी पाहिले आहेत व ते ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. खुद्द सिंदखेड येथे देशपांड्यांच्या घराण्याच्या शाखा, फडणीस ऊर्फ देशमुख यांचे घर श्री. रामकृष्ण खेकाळे, राजोपाध्ये व पूर्वीचे देशमुख, मुळे यांचे घर इत्यादी घराणी तेथे आहेत. देऊळगावराजा येथे श्री. खंडेराव देशपांडे जाधवांचे बक्षी माधवराव बक्षी यांचे कुटुंब व मुळे यांचे घर, तेथील पटवाऱ्यांचे घर इत्यादी अनेक कुटुंबे आहेत. त्यांच्याकडे आणि त्याशिवाय इतरही घराण्यांकडे कागदपत्रे सापडण्याचा संभव आहे.
सिंदखेड येथील जाधवांच्या इमारतीचे अवशेष व ऐतिहासिक स्मारके सिंदखेड व देऊळगावराजा येथे बरीच आहेत; पण रक्षणाच्या प्रयत्नाच्या अभावी ती हल्ली नामशेष होत आहेत. लखुजी जाधवांच्या दगडी महालाचे प्रवेशद्वार व त्यावरील बाराद्वारी, त्या महाला जवळ लाकडी महाल, गांवाबाहेरील रंगपंचमी महाल, लखुजी जाधवांची समाधी उर्फ घुमट आणि जाधव घराण्यातील इतर समाधी तसेच देऊळगाव येथील गढी, मोतीसमाध आणि जाधव घराण्यांतील इतर समाधी या ऐतिहासिक दृष्टीने संरक्षणीय आहेत. वास्तविक ही सर्व स्थळे जाधवांच्या वंशजांच्या मालकीची आहेत; परंतु त्यांचे हल्लीचे परिस्थितीत रक्षण होणे दुरापास्त आहे. ऐतिहासिक स्थळे म्हणून ती रक्षण करण्यात संबंध देशाचा हितसंबंध आहे. त्या दृष्टीने त्या स्मारकाची दुरुस्ती करून ती संरक्षून ठेवणे सरकारचे, त्यांतून राष्ट्रीय सरकारचे कर्तव्य आहे. लखुजी जाधवाच्या समाधीचे मंदिर भव्य आणि मजबूत दगडी बांधणीचे आहे, परंतु ते अगदी हल्ली गलिच्छ स्थितीत आहे. तेथे गुरेही बसून मलमूत्र विसर्जन करितात. झाडपूस करावयाचीही व्यवस्था नाही. शिवाजी महाराजांच्या मातामहांची आणि मातुलाची समाधी अशी अव्यवस्थित आणि दुर्लक्षित असावी, हे महाराष्ट्रीय म्हणविणारास मुळीच शोभणारे नाही. म्हणून यासंबंधात मुद्दाम पुराणवस्तु खाते आणि मध्य प्रांत व वऱ्हाड सरकारकडेही निवेदन पाठविले आहे.
पुष्करणी |
लाकडी महाल कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे, पण तो महाल आता शिकस्त झाला आहे. जो भाग हल्ली आहे, त्याचा चावडीसारखा उपयोग होतो. हा महाल मोगलपद्धतीच्या कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तो भाग जरी दुरुस्त करून ठेवला, तरी त्यातील कलेची कल्पना येईल. रंग महाल म्हणून जो प्रसिद्ध महाल आहे, त्याची रचना उत्तरेस देवडी व बाकीच्या तिन्ही बाजूस आत चौक साधून दिवाणखाने काढले होते. पैकी पूर्व आणि दक्षिण बाजूचे दिवाणखाने शिकस्त झाल्यामुळे काढले आहेत. पश्चिमेच्या बाजूचा दिवाणखाना अद्याप शाबूत आहे. तेथे शाळा भरत असते. तेथून शाळा दुसरीकडे नेऊन तो दिवाणखाना दुरुस्त करून संरक्षून ठेवणे अवश्य आहे. जेथे शाहू आणि जिजाबाई रंगपंचमीचा खेळ खेळले, तो हा रंगमहाल म्हणतात. या दंतकथेत तथ्य कांही असो (वा नसो), पण तो महाल संरक्षण करून ठेवणे अवश्य आहे. जाता जाता आणखी एका स्थळाचा उल्लेख करणे अवश्य आहे. ते स्थळ म्हणजे मोठा तलाव. एक दगडी मजबूत धरण बांधून हा तलाव केला आहे, धरण आणि धरणाच्या आंत बांधलेली सात मजली विहीर शाबूत आहे परंतु अनेक वर्षापासून तलाव गाळलेला शिवाय आत पाणी आणून सोडण्याकरिता पहाडामधून मोठे चर खणले होते ते फुटल्यामुळे पाण्याचा व्हावा तसा साठा होत नाही. तलावातील गाळ खणून काढून साठवण जास्त केल्यास आणि बाहेरचे पाणी आंत सोडावयाचे चर दुरुस्त केल्यास या तलावाच्या पाण्याने ४-५ शे एकर जमीन वहीत होण्यासारखी आहे. ही सरकारी उत्पन्नाची बाब असल्यामुळे प्रांतीय सरकारने या कामी खर्च केल्यास या तलावापासून सरकारास उत्पन्नही येईल आणि पूर्वीच्या राजवटीच्या वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही संरक्षण ठेवण्याचे श्रेय येईल. या संबंधी प्रांतीय सरकारकडे सूचना पाठविण्याचेही ठरले आहे.
जाधवराव घराण्यातील पुरुषांचे समाधी स्थळ |
सारांश श्रीशिवाजीमहाराजांनी मराठी ( हिंदवी ) (स्व)राज्य स्थापन केले. त्यापूर्वी परिस्थिती काय होती, स्वराज्याचा वृक्ष लावण्यापूर्वी जमीन कसकशी तयार होत गेली, याचे दृष्य आपणास लखुजी जाधवांच्या आणि समकालीन अशा नी, मालोजी भोसल्यांच्या काळच्या इतिहासाच्या अभ्यासानेच कळून येण्यासारखे आहे. त्या इतिहासाची साधने शिंदखेड, देऊळगावराजा, भोस, वेसळ, दौलताबाद इत्यादी स्थळांच्या परिसरांतच दृष्टीत पडण्याची संभव आहे.
इतर चित्रे :
लखुजी जाधवराव यांचे समाधीस्थळ ‘घुमट’ |
घुमट |
घुमट |
दयनीय अवस्थेत नीळकंठेश्र्वर मंदिर |
जीर्ण रंगमहाल |
मंदिर आणि मंदिर परिसराची दुरवस्था (दारूच्या बाटल्या, ई.) 👇👇
Very well described!!
ReplyDelete🙏🙏
Deleteकासाराचा वाडा या बद्दल अधिक माहिती आणि छायाचित्रे पहावयास मिळाली तर खूप बरे होईल
ReplyDelete