ई. स. १६२४ मध्ये आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातील वैमनस्य कळसाला पोहोचले होते. आपली ताकद वाढावी म्हणून दोघांनीही दख्खनचा मुघल सुबेदार ‘महाबतखान’ याची मदत घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. दोन्ही शाह्यांनी मुघलांना सहाय्य देऊ करण्याचे आश्वासन दिले. मलिक अंबरने आपला दूत आली शेर, तर अली आदिलशहाने आपला मुख्य सरदार ‘मुल्ला मुहम्मद लारी’ यांना महाबतखानाकडे पाठवले. मलिक अंबर महाबतखानाच्या भेटीसाठी स्वतः देऊळगाव येथे येऊन राहिला. पण महाबतखनाने आदिलशहाशी तह केला आणि मलिक अंबरच्या प्रस्तावाला चूल दाखवली. मुघल आणि आदिलशाह यांच्यातील तहाने मलिकची झोप उडवून टाकली. ठरल्याप्रमाणे मुल्ला महम्मद लारीसोबत सोबत आदिलशाहने ५००० घोडदळ पाठवलं. मलिक अंबरने मध्येच लारीला गाठू नये म्हणून राजे लखुजी जाधवराव आणि राजे उदाराम यांना बालाघाट( माहूर पुसद घाट) येथे पाठवण्यात आले.
मलिक अंबरने हवेची दिशा बघितली होती. येत्या काळात आदिलशाही आणि मुघल दोन्ही फौजांशी एकाच वेळी लढावे लागणार आहे याचा त्याने अंदाज बांधला होता. त्याने निजामशहाला खडकीहून ( आजचे औरंगाबाद) देवगिरी किल्ल्यावर नेऊन ठेवलं खडकी शहर रिकामं केलं आणि कुतुबशहाच्या गोवळकोंडा राज्याच्या सीमेकडे - कंधार कडे - चौथाई मागण्याच्या बहाण्याने तो निघाला. त्याने कुतुबशहाची भेट घेतली. त्याच्याशी तह करून, त्याची मदत मिळवून तो परत फिरला. अशा प्रकारे Balance Of Power तयार करून झाल्यावर मलिक अंबरने नवीन योजना आखली.
मलिक अंबर कुतुबशाही मुलखाकडे निघून गेल्यामुळे इकडे शाहजादा परवेज आणि महाबतखान आता थोडे निवांत झाले होते. मुल्ला महम्मद लारी त्याचे ५००० घोडदळ घेऊन सुखरूप बुऱ्हाणपूर येथे आला होता. हा काळ शहाजहानच्या बंडाचा होता. त्याला थांबवणे गरजेचे होते. म्हणून रिझवी खानाला खानदेश, शहानावाज खानाला जालना, जाधवराव - उदाराम यांना बालाघाट, असदखानाला अचलपूर या ठिकाणांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून तसेच सरबुलंदराय याला तात्पुरती दख्खनची सुबेदारी सोपवून परवेझ आणि महाबत दोघेही उत्तरेच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी निघून गेले.
बिदरची बरिदशाही संपल्यापासूनच बिदरचा ताबा घेण्यासाठी निझामशाही आणि आदिलशाही फौजा एकमेकांशी लढत होत्या. महाबतखान आणि परवेझ दोघेही उत्तरेकडे रवाना झाल्याचा फायदा मलिक अंबरने घेण्याचे ठरवले. गोवळकोंड्याहून त्याने बिदर गाठलं आणि बिदर लुटून आपला मोर्चा थेट आदीलशाही राजधानी - बिजापूर - कडे वळवला. (नकाशा पहा) दोन्ही सैन्यात तुंबळ लढाई झाली. बिजापूरला वेढा पडला. आदिलशाही फौजा त्याचा सामना करण्यास असमर्थ ठरू लागल्या तेव्हा आदिलशहाने स्वतःला बिजापूरात कोंडून घेतलं. संकट मोठं असल्यामुळे त्याने लगेच मुल्ला मुहम्मद लारीला आणि माहाबत खानाला निरोप धाडले. लारीला निरोप येताच त्याने सरबुलंदराय याला परत बिजापूर निघून जाण्याची परवानगी मागितली. पण महाबतखान किंवा शाहजादा परवेज नसताना आपण परस्पर परवानगी देण्यास सरबुलंदने नकार दिला. मग लारीने ३ लाख होन त्याला देऊन आपला परतीचा मार्ग मोकळा करवून घेतला आणि तो विजापूरकडे निघाला. महाबतखानाने निरोप पावताच आदिलशहाच्या मदतीला सैन्य धडण्याचा निर्णय घेतला. दक्षिणेच्या विविध मुलखात सौरक्षणासाठी तैनात असलेल्या सरदारांना विजापूर कडे जाण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार रिझवी खान, असद खान, शहानवाज खान यांसमावेत वऱ्हाडचे सरदार जाधवराव- उदाराम यांनीही बिजापूरचा रस्ता पकडला.
आदिलशहाच्या मदतीला भारी मुघल फौज निघाली आहे याची बातमी लागताच मलिक अंबरने मुघल सरदारांशी बेताची बोलणी सुरू केली. ‘ मुघलांनी आदिलशाह व निजामशाह यांच्या भांडणात पडू नये. आम्ही दोघेही बादशहाचे मांडलिक आहोत, तेव्हा दोघांच्या भांडणात एकाला सहाय्य करणे योग्य नाही.’ असा आग्रह त्याने मुघल सरदारांना केला. पण त्याच्या या बोलण्याचा कोणावरही परिणाम झाला नाही. मुघल फौज बिजापूर येथे पोहोचली आणि मलिक अंबरने तिथून काढता पाय घेतला. वेढा उठवून तो आपल्या राजधानीच्या मार्गाने निघाला. पण मुघल फौजांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्याला जमेल तिथे कोंडून संपवावे असा त्यांचा हेतू होता. मलिक पळत होता आणि मुघल त्याचा पाठलाग करत होते. मलिकने पुन्हा एकदा मुघलांशी तहाची बोलणी केली पण व्यर्थ. कुठेतरी थांबून मुघलांना तोंड देणे आता भाग होते. म्हणून त्याने भीमा नदी ओलांडून अहमदनगर पासून १० मैलांवर असलेल्या भातवडीच्या तलावापाशी आपला तळ ठोकला. भातवडीचा बांध फोडून त्याने मुघल सैन्याच्या येण्याच्या वाटेत चिखल गाळ तयार करून अडथळा निर्माण केला. काही काळ अशाच परिस्थितीत युद्ध चाललं. दरम्यान पावसाने मुघल - आदिलशाही सैन्याची अजुन वाईट अवस्था केली. मुघलांची भातवडीत कोंडी झाली. मुघल फौजेने आयतं ओढावून घेतलेलं हे संकट होतं. काही काळ असाच गेला आणि सैन्याची रसदही संपली. मुल्लाने आदिलशहाला मदत मागितली पण मलिकने ती त्याच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. आता उपासमारीची वेळ आली आणि हळू हळू एक एक सरदार रणांगण सोडून जाऊ लागले. मलिक अंबरने गनिमी काव्याने मुघल सैन्याची अजुन दाणादाण उडवली. रात्रीचे हल्ले मुघल फौजांना हैराण करून सोडू लागले. अंबरने देवगीरीहून अजुन सैन्य आणि रसद मागवून स्वतःची ताकद वाढवून घेतली. रोज काही सरदार मुघल - आदिलशाही छावणी सोडून पळून जात असत. आता मलिकने रात्रीचे हल्ले बंद करून दिवसा ढवळ्या मुघल छावणीत शिरून लूट आरंभली. मुघल सरदार प्रतिहल्ला करत पण आता त्यांची ताकद पुरती संपली होती. अशा परिस्थितीत मलिक अंबरच्या सैन्याला तोंड देणारे फक्त दोनच प्रमुख सरदार मुघल छावणीत शेवटपर्यंत शिल्लक होते. एक राजे लखुजी जाधवराव आणि दुसरे राजे उदाराम.
निजामशाही सैन्यात शहाजी राजे, शरीफजी राजे, विठोजी राजे ( शहाजींचे काका), खेळोजी राजे आणि इतर भोसले, तसेच हंबीरराव मोहिते (चव्हाण), फलटणचे मुधोजी निंबाळकर, इत्यादी नामवंत मराठा सरदार होते. तर मुघल सैन्यात जाधवराव - उदाराम जोडी लढत होती. या युद्धात शहाजी महाराजांचे बंधू शरीफजी राजे धारातीर्थी पडले.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत युद्धाचा निकाल स्पष्ट दिसू लागला. मुघल- आदिलशाही फौजांची प्रचंड हानी झाली होती. मुघल आणि आदिलशाही सैन्यातही बेबनाव दिसू लागला. अनेक मनसबदार पळून गेले होते. काहींना पकडण्यात मलिक अंबरला यश आलं. इखलास खान, मुल्ला महम्मद लारी आणि इतर पंचविस आदिलशाही सरदार आणि लष्कर खान व इतर पंचेचाळीस मुघल सरदार मलिक अंबरच्या हाती आले. खंजर खान अहमदनगर कडे पळून जाण्यास यशस्वी झाला. झांसिपार खान बिडकडे पळून गेला. इतर काही सरदारांनी अहमदनगरच्या किल्ल्यात आश्रय घेतला. जाधवराव- उदाराम यांनी बुऱ्हाणपूर कडे पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही युद्धभूमी सोडणाऱ्या शेवटच्या काही सरदारांमधील होते. मलिक अंबर भातवडीचे युद्ध जिंकला. भातवडीची लढाई निर्णायक ठरली. या लढाईची अनेकांनी हल्दी घाटीच्या लढाईशी तुलना केली आहे. मलिक अंबरने मुघलांचे गर्वहरण केले, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मलिक अंबरने आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातील वैमनस्यासाठी मुल्ला महम्मद लारीला जबाबदार धरले. त्याची धिंड काढून त्याचा शिरच्छेद करण्यात आला. इतरांना देवगिरीच्या किल्ल्यावर कैदेत टाकण्यात आलं.
या युद्धाची बातमी मुघलांना कळाली तेव्हा अनेक मनसबदार सरदारांना यासाठी जबाबदार धरण्यात आले. यात जाधवराव उदाराम यांचाही समावेश आहे. भातवडीच्या युद्धानंतर जाधवरावांचं महत्त्व कमी झालं. भोसले आणि इतर मराठा सरदार उदयास येऊन बलाढ्य होऊ लागले. लखुजींच्या महत्त्वाला भातवडीच्या युद्धापासुन ग्रहण लागले. युद्धातून पळून गेल्यामुळे उदारामावर बादशहाची नाराजी झाली. उदारामाला बालाघाटला आपल्या जहागिरीत पाठवून देण्यात आले. पुढची काही वर्षे त्याने लोककल्याणाची कामे करून सामान्य जनतेत आपलं महत्त्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
युद्धभूमीतून पळून गेल्यामुळे लखुजी आणि उदाराम यांच्या प्रतिष्ठेला तडा गेला पण पळून जाण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसावा. मलिक अंबर आणि जाधवराव - उदाराम यांच्यात अगदी सुरुवातीच्या काळापासून वैमनस्य होतं. दोन्ही आधी निजामशाही सरदार असल्याने आणि त्यांनी मलिक विरोधात आधी अनेक कारस्थानं केलेली असल्याने मुल्ला मुहम्मद लारी प्रमाणेच, किंबहुना त्याहूनही वाईट अशी वागणूक मलिक अंबरने या दोन्ही सरदारांना दिली असती. त्यामुळे ‘सर सलामत तो पगडी पचास’ असं धोरण आखून त्यांनी युद्धातून पळ काढला असावा. मलिक अंबराशी झालेल्या लढायांमध्ये ही पहिलीच अशी वेळ होती की ज्यात मुघलांनी सपाटून मार खाल्ला होता, आणि वऱ्हाडकर मराठा सरदारांना युद्धातून पळून जाण्याची वेळ आली होती. हा वऱ्हाडच्या मराठ्यांचा पहिलाच पराभव होता.
संदर्भ सूची :
१.मासिर- उल्- उमर
२.Berar Under the Mughals by Dr. Mohd. Yaseen Quddusi
३.Tuzuk - I – jahangiri४.History of Jahangir by Beni Prasad
५.कवींद्र परमानंद कृत श्रीशिवभारत
६.Malik Ambar by Jogindranath Chowdhury
७.मराठी रियासत : गो स सरदेसाई
८.THE RELATIONS OF THE MUGHAL EMPIRE WITH THE AHMADNAGAR KINGDOM (1526-1636) A thesis by Mohd. Siraj Anwar
व्हा खूप छान माहिती आणि लिखाण हि अशी माहिती आपणा कडून मिळावी या करिता खूप खूप शुभेच्छा💐💐👍
ReplyDelete🙏🙏😊
Deleteउदाजीराम राजे अ श्रेणीचे मनसबदार यांची अपरीचित माहिती आपण पुढे आणत आहात असे कार्य प्रत्येक घराण्यातील वंशजांनी केले तर श्रीमंतीचा पराक्रमाचा गौरवशाली वारसा जागृत होईल व पुढिल पिढ्या पुर्वजांचा आदर करतील व त्यांच्या ऐतिहासिक स्मृती नेहमी उर्जावान प्रेरणा देत राहतील .
ReplyDeleteजय जिजाऊ जय शिवराय