🌸~~~वऱ्हाडातील संतपरंपरा !~~~🌸
“कुवतअलिशहा मियाँसाहेब उर्फ मियाँसाहेब महाराज”
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात, अकोट शहराच्या वायव्येस काही मैलांवर ‘उमरा’ नावाचे गाव आहे. तिथे संत कुवतअलिशहा मियांसाहेब यांची समाधी आहे. मियांसाहेब महाराज हे मूळचे पंजाबचे होते. इसवी सन १८५० च्या सुमारास ते उमरा येथे आले. ते महाराष्ट्रात कसे व का आले, याची इतिहासाला माहिती नाही. पण अकोटचे प्रसिद्ध संत नरसिंह महाराज तसेच दिवठाणा, अडगावचे संत एकनाथ महाराज यांचे ते गुरु होते. अकोट येथे दरवर्षी शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत नरसिंह महाराजांची यात्रा भरत असते.
“लोकांना सर्वप्रथम मियाँसाहेब महाराज कसे ज्ञात झाले ?”
रात्रीच्या वेळी उमरा गावात एक अवलिया येऊन भिक्षा मागत असत. पण त्यांची भिक्षा मागायची पद्धत जरा निराळी होती. “हाजिर हूआ तो भेज ” असं मोठ्याने ओरडून ते ‘मी असेपर्यंत भिक्षा आणून दे’ अशी मागणी करीत असत. पूर्वी दारात आलेल्या प्रत्येक अतिथीचे यथातथ्य सोपस्कार करण्याची पद्धत असे. त्यामुळे लोक घाईघाईने त्यांच्यासाठी भिक्षा घेऊन जात. पण दारात पोहोचेपर्यंत ते महाराज तिथून निघून गेलेले असत. बरेच दिवस हे चक्र असेच चालत राहिल्यामुळे गावकऱ्यांनी स्वतःहून महाराजांचा शोध घेणे सूरु केले. आणि अखेर जितापुर नावाच्या गावाजवळ असलेल्या जंगलामध्ये गावकऱ्यांना त्यांचा शोध लागला. सगळे गावकरी तिथे जमले पण जेव्हा त्यांनी महाराजांना बघितले, तेव्हा महाराज काही वाघ आणि बिबट्यांबरोबर खेळत बसलेले होते. गावकऱ्यांना घाबरलेले बघून महाराज म्हणाले, “ सगळे प्राणी माझ्यासाठी पाळलेल्या प्राण्यासमान आहेत. तेव्हा घाबरु नका. ” पण कोणीच जवळ येण्यास तर होईना. म्हणून त्यांनी त्या हिंस्त्र प्राण्यांना दूर पाठवून दिले. या घटनेनंतर उमरा येथील गावकऱ्यांनी महाराजांना उमरा गावी येऊन राहण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहाखातर महाराज उमरा येथे वास्तव्यास आले. तेच हे कुवतअलीशहा उर्फ मियाँसाहेब महाराज.
मियाँसाहेब महाराज मंदिर |
मियाँसाहेब महाराजांची समाधी |
उमरा येथे वास्तव्यास असताना महाराज प्राण्यांची,पक्ष्यांची सेवा करीत असत. काही अंतरावरुन पाण्याचा घडा विहिरीत फेकून ते पाणी भरीत असत. असे चमत्कारिक रित्या विहिरीतून पाणी काढल्यावर ते छोट्या छोट्या पात्रांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवत असत. संध्याकाळ होताच लोक त्यांच्यासाठी भाकऱ्या करून आणीत. तेव्हा प्रत्येक भाकरीच्या बदल्यात ते आपल्या झोळीतून १-१ पैसा काढून देत असत. ते पैसे कुठून येत याचा काही थांगपत्ता नसे.
उम्र्यापासून दोन मैलांवर मक्रमपुर नावाचे गाव आहे. तिथे रावजी थुटे नावाचे एक भाविक सद्गृहस्थ राहत असत. ते रोज आपल्या घरून मियाँसाहेब महाराजांकरिता जेवण आणीत असत. असे त्यांनी अविरत १२ वर्षे केले. एके दिवशी रस्त्यात लागणाऱ्या लेंडी नदीला पूर आल्यामुळे रावजी रस्त्यातच अडकले. पण महाराजांनी त्यांना ‘ न घाबरता नदी ओलांडण्याचा’ आदेश दिला. त्यांनी पाऊल पुढे टाकताच, नदीचे पाणी ओसरून गेले आणि रावजींसाठी रस्ता मोकळा झाला.
कुवतअलिशहा मियाँसाहेब ९४ वर्षे जगले. नरसिंहबुवा अथवा नरसिंह महाराज आणि एकनाथबुवा अथवा एकनाथ महाराज हे दोन्ही त्यांचेच शिष्य होते. १८७० साली ब्रिटिशांनी वऱ्हाड प्रांताचे गॅझेटियर लिहिले त्यात ‘ एकनाथबुवा मुस्लिम असूनही हिंदू त्यांना ब्राह्मण मानतात ’ असे म्हटले आहे.
कुवतअलीशहा मियाँसाहेब यांच्या समाधी स्थळाला मुस्लिम लोक दर्गाह तर हिंदू लोक पवित्र देवस्थान मानतात. हिंदू भाविक भजनी पद्धतीने मियाँसाहेब महाराज यांची उपासना करतात. तिथे काकड आरती केली जाते. हिंदूजन मियाँसाहेब महाराजांना मिनानाथ महाराज असेही म्हणतात.
चराचरात ईश्र्वर वसतो आणि सगळे धर्म-पंथ-संप्रदाय हे त्या एकाच ईश्वराच्या प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आहेत असे मानत सगळ्या उपासना प्रवाहांना आपल्यात सामावून घेणाऱ्या हिंदूंच्या सांस्कृतिक स्वभावाचा हा एक नमुनाच आहे असे म्हटल्यास हरकत नाही.
संदर्भ सूची :
१. Akola District Gazetteer, 1870
२. Central Provinces and Berar district Gazetteer Volume -A by C. Brown ICS
© Vinit Raje
(वऱ्हाडच्या अशाच अलिखित आणि अपरिचित ऐतिहासिक गोष्टींसाठी varhadnama.blogspot.com या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच @varhad_nama या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.)
Comments
Post a Comment