अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पूर्वेस १२ किमीवर अडगांव बुद्रुक नावाचं गाव आहे. गेल्या शतकभरापासून वऱ्हाडच्या संतपरंपरेच्या इतिहासातील एक सोनेरी पान येथे विसावा घेते आहे. भास्कर महाराज हे सद्गुरू श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्य. त्यामुळे या गुरुशिष्यांच्या उल्लेखावाचून वऱ्हाडच्या संतपरंपरेचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.
गजानन महाराज आणि योगमार्ग
ह्या लेखात काही विषयांवर चर्चा करत त्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन महाराजांच्या सान्निध्याचं गांभीर्य समजून घेण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या हिंदुभूने हजारों वर्षे खत पाणी घालून वाढविलेल्या योगविज्ञानाच्या वृक्षाचे भास्कर महाराज हे एक फळ आहेत. या भूमीवर हजारो योगी होऊन गेले. त्यांनी कायम जनसामान्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. मग ते आदियोगी शिव असोत, अगस्त्य मुनी असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, गुरुदेव दत्त असोत, आदी शंकराचार्य असोत, भगवान बुद्ध असोत, भगवान महावीर असोत, श्रीपाद श्रीवल्लभ असोत, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या संतशृंखलेतील ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम महाराजांपर्यन्त कोणीही असोत, या सगळ्यांनी प्रापंचिक जीवन जगणाऱ्या सामान्य लोकांच्या जीवनाला अध्यात्माची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. हीच परंपरा पुढे नेण्याकरिता गजानन महाराज अवतरित झाले. आणि वऱ्हाड ही त्यांनी त्यांची कर्मभूमी निवडली. पण दुर्दैवाने बहुतेक लोकांनी त्यांच्या अस्तित्वाचं रहस्य आणि त्यांच्या सान्निध्यात असलेल्या प्रगतीच्या प्रचंड शक्यतेला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. स्वामी दासगणू महाराजांच्याच शब्दात सांगायचे तर,
“कल्पवृक्षाच्या तळवटीं । बसून इच्छिली गारगोटी ।
वा मागितली करवंटी । कामधेनूपासून ।।”
कल्पवृक्षाच्या खाली बसून कोणी गारगोटी मागावी, किंवा ज्याची ईच्छा करू ते देणाऱ्या कामधेनूला करवंटी मागावी, असा तो प्रकार झाला. असे असले तरी जिथे जिथे गुरूला शिष्यात अध्यात्मिक प्रगतीची शक्यता दिसेल, तिथे तिथे ते त्याला पूर्णत्वाला पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांना भास्कर महाराजांमध्ये हीच शक्यता दिसली असावी. दासगणू महाराज म्हणतात,
“ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें ।
तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ।।”
अध्यात्माची सांगड म्हणजे काय?
अध्यात्म हा शब्द उच्चारताच अनेकांच्या मनात अनेक गमतीशीर कल्पना येतात. काहींना अध्यात्म म्हणजे हिमालयात निघून जाणे नि संसार टाकून देणे वाटते, काहींना अध्यात्म म्हणजे देवदेव करत बसणे वाटते, काहींना अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे नेसून गावोगाव भटकणे वाटते. हे सगळे योगीजनांसाठी त्यांचे मार्ग असले तरी अध्यात्मिक तळमळ नसलेल्या माणसाच्या ह्या सगळ्या हास्यास्पद कल्पना आहेत. आपलं शरीर आणि आपलं मन यांच्या पलीकडे आपलं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाला स्पर्श करणे, त्या अस्तित्वाची जाणीव होणे आणि त्या अस्तित्वाच्या जाणिवेत जगणे म्हणजे अध्यात्म होय. या स्थितीला भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत ‘योग’ म्हणतात. अशा जाणिवेत जगून आपले कर्म करण्याला ते ‘योगस्थ: कुरु कर्माणि’ म्हणतात. ही जाणीव आपल्याला या शरीर आणि मनापासून उद्भवणाऱ्या सगळ्या अडथळ्यांपासून मुक्त करते. ही स्थिती अवगत करणे प्रत्येकालाच शक्य आहे. प्रत्येक व्यक्ती हे करण्यास समर्थ आहे. ह्या स्थितीचा 'अनुभव' सगळ्यांना अवगत करवणे ह्यालाच अध्यात्माची सांगड घालणे म्हणतात. या आध्यात्मिक प्रवासात अनुभवाला फार महत्व आहे. स्वामी दासगणू महाराज म्हणतात,
“संतत्व नाही मठात | संतत्व नाही विद्वत्तेत |
संतत्व नाही कवित्वात | तेथे स्वानुभव पाहिजे ||”
एकदा आपण ही योगस्थिती मिळवण्याच्या प्रयत्नाला लागलो की येतो स्वानुभव. स्वानुभव म्हणजे ‘स्व’चा अनुभव! जर मी मन आणि शरीर नाही, तर मी काय आहे? ह्याचा नेमका अनुभव म्हणजे ‘स्वानुभव’. याला प्रत्येक योगीने आपापल्या परीने उद्धृत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण स्वानुभवाशिवाय हे शब्द म्हणजे केवळ भावनाहीन शब्दच. त्याहून अधिक त्यांची काहीच किंमत नाही. म्हणूनच येथे ‘स्वानुभव’ पाहिजे. स्वानुभवाशिवाय अध्यात्म नाही.
आपल्या मनाच्या आणि शरीराच्या जोखडातून मुक्त होण्याच्या मार्गाला आपण लागलो म्हणजे आपले आयुष्य आपण हवे तसे घडवू शकतो. शरीर आणि मन यांच्या मर्यादा उल्लंघुन आपण स्वतःला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला, आपल्या स्वभावाला हवे तसे घडवू शकतो. योगी हा कायम स्वतःला मन आणि शरिराच्या जोखडातून उत्पन्न झालेल्या अपंगत्वापासून 'पूर्णपणे' मुक्त करण्याच्या प्रयत्नात असतो. ही त्याच्या मुक्तीची अंतिम पायरी असते. आपल्या आयुष्याचे चार महत्त्वाचे अंग आहेत. शरीर, मन, भावना चैतन्य. या चैतन्यालाच आपण ऊर्जा किंवा आत्म म्हणू शकतो. योगी आपल्या योगसाधनेतून या एकेका अंगावर विजय मिळवत अखेर चैतन्यावर आणि पर्यायी आपल्या जन्म आणि मृत्यूवर विजय मिळवून ‘मृंत्युंजयी’ होतो. (यात कर्म देखील महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि मृत्युंजयी होण्याआधी योग्याला त्याच्या कर्माचं पोतं रिकामं करण्याची आवश्यकता असते. पण ते आपण पुढच्या भागात बघू.) हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा. ही स्थिती आणि हे सामर्थ्य मिळवण्यासाठी अर्थातच त्याच्याकडे साधने आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, क्रियायोग असे हे त्याचे विविध मार्ग आहेत. एक एक करत चैतन्यावर विजय मिळवल्यानंतर आता त्याला संपूर्ण स्वातंत्र्य मिळते. त्याला जगायचे असेल तर तो जगू शकतो. त्याला देह सोडून अनंतात विलीन व्हायचे असेल, मारायचे असेल तर तो ते करण्यास समर्थ आहे. त्याला पुन्हा जन्माला यायचे असेल तर तो तेही करू शकतो. त्याला तसेच बसून रहायचे असेल तर तो तेही करू शकतो. कधीही या बाबतीत विचार न केलेल्या माणसाला या सगळ्या गोष्टी तात्विक वाटत असल्या आणि इतक्या पुढे जाण्याची त्याला ईच्छा नसली, तरीही प्रत्येक व्यक्ती ही त्याच दिशेने जाते आहे, असे योगविज्ञान मानते. मनाच्या मर्यादा ओलांडून आपले आयुष्य आपल्या पद्धतीने घडवण्याची ईच्छा प्रत्येकाची असते, हे त्याचेच द्योतक आहे.
श्रीभास्कर - गजानन भेट
आता मूळ गोष्टीकडे वळू. दासगणू महाराजांनी जरी गजानन महाराजांच्या तोंडी भरपूर वाक्ये घातली असली, तरी गजानन महाराज फारसे बोलत नसत असे त्यांना पाहिलेल्या बळवंत खापर्डे यांचे म्हणणे आहे. गजानन महाराज स्वतःशीच काहीतरी बोलत असत, आणि भक्त त्यातून अर्थ लावीत, असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या गोष्टीच्या दृष्टीने महाराज बोलतेच सोयीचे असले आणि इथून पुढे संवाद घातलेले असले तरी वाचकांनी ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. गुरूकडून शिष्याकडे वाहणारी ज्ञानगंगा शब्दस्वरूपातच वाहते असे नाही. गुरूने नुसत्या दृष्टीने किंवा स्पर्शाने अनुग्रह दिल्याची अनेक उदाहरणं आहेत. किंबहुना केवळ काहीच गोष्टी या शब्दांतून दिल्या जाऊ शकतात. मुख्य भाग देताना शब्द अपुरे पडतात आणि म्हणूनच गुरुकडून शिष्याकडे पुढची देवाण ही ऊर्जेच्या माध्यमातून होते.
एके दिवशी भटकत भटकत गजानन महाराज अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील भास्कर पाटील जायले याच्या शेतात येऊन थांबले. महाराजांना तहान लागली होती. भास्कर पाटलाला त्यांनी पाणी मागितले. ‘नाही म्हणू नको. पाणी पाजण्याचे पुण्य थोर आहे. म्हणूनच धनिकांनी हमरस्त्याला पाणपोया लावून ठेवल्या आहेत’ असे ते त्याला म्हणाले. त्यावर भास्कर पाटील म्हणाला,
“तुझ्यासारख्या दांडग्या माणसाला पाणी पाजण्यात कसलं आलंय पुण्य? अनाथ आणि अपंग लोकांच्या केलेल्या सेवेत पुण्य आहे. किंवा जो समाजहितासाठी झटतो त्याला मदत करण्यात काही अर्थ आहे. तुझ्यासारख्या भोंदुला पाणी पाजणे हे तर उलट पाप होईल. भूतदया म्हणून कधी कोणी साप पाळलाय का? किंवा कोणी चोराला कधी घरात आश्रय देईल काय? तु भिक मागून स्वतःचे शरीर धष्टपुष्ट केले आहेस. मी माझ्यासाठी पाण्याची घागर भरून आणली. त्या आयत्या पिठावर तू आता रेघोट्या ओढू नको. चांडाळा! आपलं काळं कर आणि जा इथून. तुझ्या सारखे निरुद्योगी आमच्या समाजात जागोजागी जन्मलेत म्हणूनच आम्ही आज जगात अभागी झालो आहोत.”
ईथे ईतर गोष्टींसोबतच भास्कर पाटलाच्या ठायी समाजाप्रती आणि देशाप्रती असलेली चिंता दिसून येते. आपल्या व्यक्तित्वाला स्वतःपासून कुटुंबापर्यंत, कुटुंबापासून समाजापर्यंत, समाजापासून देशापर्यंत, नि देशापासून पुर्ण ब्रह्मांडापर्यंत वाढवणे हेच ‘अहं ब्रह्मास्मि’ होय. आपण पूर्ण ब्रह्मांड होणे यालाच योग म्हणतात.
'योग' या शब्दाची व्याख्या करताना भगवान श्रीकृष्ण भगवदगीतेत म्हणतात,
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ (6.29)
(अर्थ - ती व्यक्ति जिचं मन 'योग'यूक्त (समस्त सृष्टीशी एकरूप) झालं आहे, ती सगळ्या प्राणिमात्रांमध्ये स्वतःला आणि स्वतः मध्ये सर्व प्राणिमात्रांना बघते.)
भास्कराने लावलेले बोल ऐकून स्वामी स्मितहास्य करत तिथून निघून गेले. जवळच शेतातल्या एका विहिरीकडे ते जाऊ लागलेले पाहता भास्कर पाटील ओरडुन म्हणाला,
“अरे पिश्या! तिकडे कशाला जातोस? ती कोरडी विहीर आहे. त्या विहीरीतच काय, ह्या भागात एका कोसाच्या परिसरात तुला कुठेही पाणी मिळणार नाही.”
हे ऐकून महाराज म्हणाले,
“प्रयत्न करतो! तुझ्यासारखे बुद्धिवान लोक पाण्याविना हैराण झाले आहेत.”
महाराज विहिरीपाशी आले. विहीर कोरडी होती. ते शेजारच्या एका झाडाखाली दगडावर ध्यानस्थ बसले. काही वेळात पाण्याने विहीर भरून निघाली. महाराज पाणी पिऊ लागले. हे दृश्य पाहून भास्कर पाटील अचंबित झाला. कोरड्या विहिरीतून ही व्यक्ती पाणी पिते तरी कशी म्हणून तो धावत महाराजांकडे आला. इथे त्याला सगळा प्रकार लक्षात आला आणि त्याने महाराजांचे पाय धरले.
विहिरीतून पाणी येण्याच्या ह्या घटनेवर अथवा चमत्कारावर सगळ्यांनीच भर दिला आहे. पण भास्कर पाटील याच्या आयुष्यातील आणि या कथेतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती यानंतर. भास्कर पाटील महाराजांची क्षमा मागू लागला. ‘आपली चूक झाली. आपणास माफ करा!’ अशी विनवणी करत रडु लागला. “हा प्रपंच खोटा आहे हे माझ्या आता लक्षात आले आहे!” असे म्हणू लागला. महाराज त्याला म्हणाले,
“आता तुला रोज गावातून घागर आणून पाणी प्यायची गरज नाही. तुझ्यासाठीच हे पाणी मी विहिरीत आणलं आहे. आता तू प्रपंच खोटा आहे वगैरे गोष्टी का करतोस? तुझ्यासाठीच पाणी आलं आहे. आता छान मळा लाव!”
यावर भास्कर पाटील म्हणाला,
“गुरुनाथा! आता हे आमिष दाखवू नका. माझ्या मनाची ही विहीर इतकी वर्षे कोरडी पडलेली होती. तुम्ही त्यातील खडकाला साक्षात्काराचा सुरूंग लावला. त्याने ह्या फुटलेल्या खडकाला ‘भावा’चे पाणी लागले. आता मी निःशंक मळा लावीन. पण हा नव्हे. तर भक्तीपांथाचा!”
इथे सद्गुरू श्री गजानन महाराज भास्कर पाटील यांची वृत्ती बघत असावेत, त्यांची ईच्छा बघत असावेत. साहजिकच इथे नुसता एवढाच नाट्यमय संवाद झालेला नाही. इथे भास्कराला साक्षात्कार झाला आहे. इथे त्याहून अधिक महत्त्वाचे काहीतरी घडले आहे ज्याने भास्कर पाटलाला प्रपंच खोटा वाटू लागला आहे. गजानन महाराजांच्या इतर भक्तांमध्ये हा साक्षात्कार झालेला बघायला मिळत नाही. इथे बरंच काही घडलं आहे जे फक्त त्या गुरुशिष्यांनाच माहित! कदाचित भास्कराच्या आयुष्यात ही आध्यात्मिक तळमळ आधीपासूनच असावी. कदाचित ती त्याच्यात त्याच क्षणी उत्पन्न झाली असावी. कदाचित आधीपासूनच असलेली तळमळ जी त्याआधी त्याच्या ध्यानात कधी आली नाही ती गजानन महाराजांनी घडवून आणलेल्या साक्षात्कारमुळे आणखीनच उत्कट झाली असावी. कदाचित महाराजांनाच त्याच्यात आध्यात्मिक प्रगतीची शक्यता दिसली असावी. काहीही असले तरी काही दिवसांतच गजानन महाराज या साधारण भास्कराला त्याच्या मर्यादित व्यक्तीत्वातून मुक्त करून मृत्युंजयी करणार होते, हे नक्की. महाराजांनी भास्कराला आपला शिष्य बनवले आणि तेथून कायम तो महाराजांच्या संनिध्यात राहू लागला.
“तुम्ही गुरूच्या शोधात जाऊ नका. जेव्हा अज्ञानाच्या वेदनेचे रूपांतर किंकाळीत होईल, गुरू स्वतः तुमच्या शोधात येतील! ”
- सद्गुरू श्री जग्गी वासुदेव
(पुढे वाचा वऱ्हाडची संतपरंपरा ३ - ‘हरहर! आणि भास्कर मृत्युंजयी झाले’!)
संदर्भ सूची -
१. श्री गजानन महाराज विजय ग्रंथ.
२. श्री संत नरसिंग महाराज चरित्र.
३. श्री गजानन महाराज चरित्रकोष.
४. Akola District Gazetteer, 1870.
५. Central Provinces and Berar district Gazetteer, 1910 Volume -A by C. Brown ICS
Comments
Post a Comment