Skip to main content

Posts

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शाम...

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १

                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.                शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.                भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले ...

पहिला पराभव - भातवडीचे युद्ध

                ई. स. १६२४ मध्ये आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातील वैमनस्य कळसाला पोहोचले होते. आपली ताकद वाढावी म्हणून दोघांनीही दख्खनचा मुघल सुबेदार ‘महाबतखान’ याची मदत घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. दोन्ही शाह्यांनी मुघलांना सहाय्य देऊ करण्याचे आश्वासन दिले. मलिक अंबरने आपला दूत आली शेर, तर अली आदिलशहाने आपला मुख्य सरदार ‘मुल्ला मुहम्मद लारी’ यांना महाबतखानाकडे पाठवले. मलिक अंबर महाबतखानाच्या भेटीसाठी स्वतः देऊळगाव येथे येऊन राहिला. पण महाबतखनाने आदिलशहाशी तह केला आणि मलिक अंबरच्या प्रस्तावाला चूल दाखवली. मुघल आणि आदिलशाह यांच्यातील तहाने मलिकची झोप उडवून टाकली. ठरल्याप्रमाणे मुल्ला महम्मद लारीसोबत सोबत आदिलशाहने ५००० घोडदळ पाठवलं. मलिक अंबरने मध्येच लारीला गाठू नये म्हणून राजे लखुजी जाधवराव आणि राजे उदाराम यांना बालाघाट( माहूर पुसद घाट) येथे पाठवण्यात आले. मलिक अंबरने हवेची दिशा बघितली होती. येत्या काळात आदिलशाही आणि मुघल दोन्ही फौजांशी एकाच वेळी लढावे लागणार आहे याचा त्याने अंदाज बांधला होता. त्याने निजामशहाला खडकीहून ( आजचे औरंगाबाद) देवग...

जाधवांचिये नगरी

(१९४७ साली ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. य. खू. देशपांडे यांनी सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. तेव्हा त्यांनी “जाधवांचिये नगरी” या आपल्या लेखात सिंदखेड येथील ऐतिहासिक वास्तूंची माहिती आणि परिस्थिती लिहून ठेवलेली आहे. त्याच लेखातील निवडक भाग खाली देत आहे. सदर लेखात दिलेल्या सिंदखेडच्या परिस्थितीत आजही विशेष काही बदल झालेला नाही. रंगमहाल आणि निळकंठेश्र्वर मंदिर (प्राचीन) ह्या वस्तू अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. नीळकंठेश्र्वर मंदिराच्या परिसरात दारूच्या फुटलेल्या बाटल्या बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या आत जंगली गवत उगवल्याचे लक्षात येते. आसपासच्या भागात अनेक देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती ऊन वारा पाऊस यांचा मार खाण्यासाठी सोडून दिलेल्या आढळतात.) जाधवांचिये नगरी :                 लखुजी जाधवांना शिंदखेडची देशमुखी मिळाल्यानंतरचे अनेक अवशेष सिंदखेड येथे आणि देऊळगावराजा येथे आहेत. शिंदखेडास सिद्धक्षेत्र म्हणत असत, असे गोसावीनंदन यांच्या ज्ञानमोदक ग्रंथावरून दिसते. क्षेत्र म्हणून अद्यापही त्याची प्रसिद्धी आहे. लखुजी जाधवांच्याही अगोदरच...

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्...

शहाजहानचे बंड आणि वऱ्हाडकर मराठे

नरनाळा किल्ला                       ई. स. १६२१ मध्ये दक्षिणेत विजय मिळवून आलेल्या आपल्या मुलाला - खुर्रमला - जहाँगीर बादशहाने शहाजहान हा खीताब दिला तेव्हा त्याला आपल्याच घरात निर्माण होणाऱ्या यादवीची कल्पना देखील नसेल. काहीच वर्षे आधी मलिक अंबराचा पराभव करून आलेल्या आणि निजामाचा दरबार सोडून आलेल्या मराठा सरदारांवर आपण जो कृपेचा वर्षाव केला, त्याची परतफेड आपल्याच विरोधातील उठावाला सहाय्य करून हे कपटी मराठे करतील, याचाही त्याने कधी विचार केला नसेल. १६२१ च्या मध्यापासूनच जहाँगीराची पत्नी नुर जहान शहाजहान विरुद्ध राजकारण खेळू लागली होती. त्याची भिती डोक्यात शिरल्यामुळेच शहाजहान ने बंड करण्याचा निर्णय घेतला. त्याचा उत्तरेतील जहागिरीचा मुलुख कमी करून तेवढ्याच जहागिरीचा मुलुख त्याला दख्खन मध्ये देण्यात आला, कंदाहरकडे जाण्याची आज्ञा दिली गेली आणि त्याने तिकडे जाण्यास नकार दिल्यावर जेव्हा वारंवार त्याच्याकडे कंदाहरच्या स्वारीसाठी सैन्य पाठवून देण्याची मागणी होऊ लागली, तेव्हा त्याने बंडाचा झेंडा उभारला. त्या बंडात त्याला दक्षिणेतील सरदारांचे ...

दख्खनचे राजकारण : ई. स. १६१६ ते १६२१

          ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले.           इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि  ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाख...

मराठ्यांचे महत्त्व २ : रोशनगांवची लढाई !

माहूर येथील किल्ल्याचा हत्ती दरवाजा            ई. स.१६१२ मध्ये अंबराने आपली राजधानी देवगिरीहून खडकीला हलवली. मलिक अंबराच्या सैन्याकडून अनेकदा पराभूत झाल्यानंतर मोगलांना अंबराची खरी ताकद कळू लागली होती. याच दरम्यान मलिक अंबर आणि मराठा सरदारांच्या एका गटामध्ये मतभेद उत्पन्न होऊ लागले होते. लखुजी जाधवराव आणि उदाजीराम हे त्यात मुख्य होते. त्यांच्यात नेमके काय मतभेद होते, हे ज्ञात नाही. पण याचा बराच फायदा मोगलांना झाला, हे मात्र निश्चित. पराजयाची मालिका कशी थांबवावी या पेचात असताना जहांगीर बादशहाने पुन्हा खान इ खानानला दख्खनचा सुभेदार नेमलं. खान इ खानान मोगलांमध्ये दख्खनचा जाणता होता. त्याच्या तीन मुलांना मनसबदारी आणि बक्षिसे देऊन त्याला मलिक अंबराचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. बाळापूर येथे मोगली सैन्याचा तळ पडला. आधीचे पराभव तो विसरला नव्हता. आता त्याने शांततापूर्ण पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. पूर्वीप्रमाणेच मोगली सरदारांमध्ये आपसांत मतभेद, द्वेष ई. कायम होते. त्याने हळूहळू ही डोकेदुखी कमी केली. एक एक करून सरदार मरू लागले. आपल्या विरोधकांना संपवल...

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष          मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.            ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुर...

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्...

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवर...