
ई. स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मोगल साम्राज्यात दोन गट पडले - एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगजेबाचा. अशी बंडाळी माजली असताना माहुरच्या राजे उदाजीराम (मृ.१६३२) यांचा मुलगा जगजीवनराव याने शहजहान बादशहास एक पत्र लिहिले. त्यात तो म्हणतो, " माझ्या शत्रूंचा माझ्या परिवारास संपवून टाकण्याचा कट आहे ". यावर शहजहानने ४ शाबान १०६८ हिजरी (ई. स. १६५७) रोजी जगजीवनरावाला उत्तर पाठवले,
"तुझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी बादशहाने सैन्य पाठविले आहे. तू आपल्या सैन्यासह बादशहाच्या दरबारात हजर व्हावे."
शहजहानचे सैन्य माहुरला पोहोचले की नाही हे कळत नाही. पुढच्या पत्रातील मजकुरातून शहजहानच्या भेटीला जगजीवनराव गेल्याचेही दिसत नाही.२९ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि दाराशुकोह यांच्यात सामुगढ येथे तुंबळ लढाई झाली. जगजीवनरावाने औरंगजेबाला सहाय्य केले. या लढाईत जगजीवनराव मारला गेला.
जगजीवनरावाच्या मृत्यूनंतर उदाजीराम घराण्यात एक पोकळी निर्माण झाली. कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे घराण्याच्या जिवावर उठलेल्या शत्रूनेही उचल खाल्ली. जगजीवनरावची आई - सावित्रीबाईने औरंगजेबाला पत्र लिहिले. ते पत्र सध्या तरी लेखकाकडे उपलब्ध नाही. पण त्या पत्रातील मजकूर वाचून औरंगजेबाला सावित्रीबाई मोगलाईतून बाहेर पडते की काय, अशी शंका आली असावी. औरंगजेबाने सावित्रीबाईंना उद्देशून लिहिलेले १५ सफर १०६८ (इ . स. १६५८) या तारखेचे पत्र उपलब्ध आहे. त्यात तो लिहितो,
“....शाहबेगखान, जो सरकारचा मदतनीस आहे, त्याच्या मार्फत बादशहाच्या (शहाजहान) शिक्क्यानिशी पूर्वीच हुकूम करण्यात आले आहेत की, आपल्या सर्व नोकर-परिवारासह तिने बादशहाच्या यशस्वी कक्षेत यावे. या हुकुमाप्रमाणे आपल्या लष्करासह येथे येण्याचा तिने निश्चय करावा जिला कृपापात्र होण्याचा हक्क आहे व जी उच्च जातीची आहे, तिने खानसाहेबाच्या विचाराने निघावें आणि आपले मन सर्वथैव ----त ठेवावें; दुसरीकडे पाहूं नये, अथवा दुसऱ्या कोणीकडे लक्ष्य ठेवू नये. बादशहाशी विचारपूस केलियावर तिला विशेष असे वृत्त कळेल. तिच्या मुलाचे लष्कर विस्कळित झाले नाही. तिने आपल्या मूलखास अगर तेथे असलेल्या जायजादीस नुक्सान पोहोचेल, असें वागू नये. या हुकमाची खुषखबर करून तिने धीर धरावा आणि जे लोक उपयोगी आहेत, त्यांना दूर करूं नये व त्या लोकांना धीर देऊन आपल्या बरोबर आणावें. ही आज्ञा समजून हल्लीच्या परिस्थितीत आमची कृपा आधार आहे, असे तिने समजावे.”
याच दरम्यान उदाजीराम घराण्याच्या शत्रूने - हरचंदरायाने(?) - माहुरवर आक्रमण केले. सावित्रीबाईने आपल्या अल्पवयीन नातवाच्या आणि घराण्याच्या संरक्षणासाठी घोड्यावर स्वार होऊन हाती भाला पेलला. भाल्याला चोळी बांधून तिने स्वतः युद्धात उडी घेतली. तिचा युद्धावेश बघून तिचे सैन्य पेटून उठले. तिने आपल्या भाल्याकडे निर्देश करून तिच्या सैन्यास आवाहन केले, "तुमची बहीण युद्धात उतरली आहे. तिची लाज राखा!!". या लढाईत शत्रूचा दारुण पराभव झाला. शत्रूचा वध करण्यात आला असावा. सावित्रीबाई विजयी झाल्या. राजे उदाजीराम आणि मलिक अंबर यांच्यातील १६१६-१७ साली झालेल्या लढाईसारखीच ही देखील लढाई झाली. औरंगजेबाच्या निर्देशाप्रमाणे सावित्रीबाई आग्र्याला गेल्या असाव्यात. औरंगजेबाला माहुरच्या लढाईची हकीकत कळली. त्याने भरल्या दरबारात सावित्रीबाईंचा "रायबाघिणी" हा खिताब देऊन सन्मान केला. "पंडिता" हा खिताब सावित्रीबाईंना कसा मिळाला याबद्दल लेखकास अजून संदर्भ / पुरावा सापडलेला नाही.
या लढाईमुळे सावित्रीबाईंच्या शौऱ्याची खबर साऱ्या साम्राज्यात पसरली. शिवभारतकार कवींद्र परमानंद सावित्रीबाईविषयी लिहितो,
"जायामुदयरामस्य जगज्जीवनमातरम् । राजव्याघ्रीति यां प्राहुर्युधि व्याघ्रीमिवोध्दुराम् । सा प्रतापेन महता बताप्रतिहतायुधा ।।"
(अर्थ - युद्धात वाघिणीप्रमाणे निर्भयी जी उदाजीरामाची पत्नी नि जगजीवनाची माता, रायबाघिणी नावाने प्रसिद्ध, मोठ्या प्रतापामुळे अप्रतिहतगती स्त्री ....)
कवींद्र परमानंदपुत्र देवदत्त व पौत्र गोविंद कृत परमानंदकाव्यम् मध्ये कवि लिहितात,
"पूज्या साहिजहानस्यात्मजस्य समरोद्धता । राजव्याघ्री यथा वीरललने लल भूतले ।। मधूकैटभसंहंत्री हंत्री दुःखस्य सर्वत: । कालीव ललयालोकांत्वमेवाकलयिष्यसि ।।"
(अर्थ - शहजहानच्या मुलाशी वीरललना, राजव्याघ्रीच जणू युद्धास सज्ज झाली, तशी मधूकैटभ (राक्षसांना मारणारी) काली! सर्व दुःखाचे निवारण करील, असा प्रकाश आपणास दिसून येईल.)
ई. स. १६३२ मध्ये सावित्रीबाईंचे पती राजे उदाजीराम यांचा मृत्यू झाला त्यावेळी जगजीवनराव अल्पवयीन होता, सावित्रीबाईने महाबतखानाच्या मदतीने अल्पवयीन जगजीवनरावच्या नावे शहाजहान कडून मनसब मिळवून घेतली होती. जगजीवनराव तेव्हापासूनच लष्करी मोहिमांत जात असे. ई. स. १६५८ साली जगजीवनरावच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा ' बाबुराव ' अल्पवयीन होता. तो लष्करी मोहिमांत जाण्यायोग्य अजून झाला नव्हता. त्यामुळे त्याच्यावतीने सावित्रीबाई मोगलांच्या लष्करी मोहिमांत सामील होऊ लागली. सावित्रीबाई या काळात आपल्या आयुष्याच्या उतारवयात असाव्यात. मुलाच्या मृत्यूने तयार झालेली पोकळी भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
औरंगझेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास दख्खनचा सुबेदार नेमले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता त्याने पुणे, सुपे, चाकण, इंदापूर वगैरे परगणे काबीज केले. यावेळी शाहिस्तेखानाला सहाय्य करण्यासाठी सावित्रीबाईंना पुण्याला पाठविण्यात आले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून आले. शाहिस्तेखानाने कहारतलबखानासोबत सावित्रीबाईची नेमणूक केली आणि आणि चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल काबीज करण्यास मोठ्या फौजेनिशी त्यांना पाठवले. सावित्रीबाई उर्फ रायबाघन हिने आतापर्यंत प्रत्यक्ष राजकारणात जरी भाग घेतलेला दिसत नसला, तरी ती अत्यंत मुरब्बी सरदार राजे उदाजीराम यांची पत्नी होती. तिने लखुजीराजेंचा मृत्यू, निजामशाहीचा अस्तकाळ, शहाजी महाराजांचा संघर्ष, अशा अनेक घडामोडी जवळून बघितल्या असण्याची शक्यता आहे. राजे उदाजीराम यांचा मृत्यू देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी देवगिरीला वेढा घातलेला असताना झाला. तेव्हा तिथे जगजीवनराव होता. सावित्रीबाई देखील असावी. तिने काहरतलबखानाला समज दिली पण त्याने ती ऐकली नसावी, असे तिच्या शिवभरतातील भाषणावरून अनुमान काढत येते.
२ फेब्रुवारी, १६६१ ला उंबरखिंडीत मोगल सैन्याला गाठून तिचा मराठ्यांनी धुव्वा उडविला. लढण्यात काहीही अर्थ नाही हे जाणून सावित्रीबाईंनी काहारतलबास शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ती काहारतलबास म्हणाली,
“शिवाजीरुपी सिंहाच्या आश्रयाखाली असलेल्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे तू वाईट काम केलेस. दिल्लीपती चे सैन्य तू तुझ्या गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोडले ही दुःखाची गोष्ट होय. आजपर्यंत दिल्लीपती ने जे काही यश मिळविले ते सारे तू ह्या अरण्यात बुडविले ! पहा ! मागे व पुढे, उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत. हे पटाईत असलेले तिरंदाज तुझे सर्व सैनिक चित्रातील मनुष्यांप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत. खेदाची गोष्ट ही की दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शाहिस्तेखानाने शत्रूच्या प्रतापरुपी अग्निमध्ये तुला सैन्यासह टाकले. शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे, तू मात्र कोंडला गेला असून आंधळ्या प्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस. फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग, नाहीतर तेच साहसाचे कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत ठरते. म्हणून तू लगेच त्या राजास शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्युपाशातून सोडीव.”
तिचा सल्ला ऐकून काहारतलब खानाने शिवाजी महाराजांकडे दुत पाठविला, खंडणी दिली, क्षमा मागितली आणि आपली सुटका करून घेतली. पुढे काही दिवसांत ई. स. १६६३ मध्ये महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. शाहिस्तेखानाची बोटे छाटली. खानाने दहशत खाल्ली. खान पुणे सोडून गेला. सावित्रीबाई आपल्या सैन्यासह मोगल मूलखात गस्त घालत होती.
राजे उदाजीराम घराणे धार्मिक कार्यात आणि दानधर्मात अग्रभागी होते. लोकोपयोगी कामात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. राजे उदाजीराम यांनी १६२४ साली आदिलबाद येथे तळे बांधून घेण्यासाठी आदिलाबादचे देशमुख त्रिंबकजी नाईक याला जमीन दिली. जगजीवनरावने १६४७ मध्ये आणि बाबुरावने १६६० मध्ये ब्राह्मणांना सनदा दिल्या त्याचे उल्लेख य. खू. देशपांड्यांनी करून ठेवले आहेत. सावित्रीबाईंनी ई. स. १६५८ साली दारव्ह्याच्या ब्रह्मणाला दिलेल्या सनदीचा मजकूर खालीलप्रमाणे,
"अज रख्तखाने महाराजा राजेश्री सावित्रीबाईसाहेबू दामदौलतहू बजानेबू कारकुनानि हाल व इस्तकबाल व देशमुखानि व देसपांडीयानि परगणे साकीन हवेली माहोर बीदानद सू || तीसा खमसैन अलफू सन हजार १०६८. बेशमी नरसींहपंत पुरानिक जुनारदार स।। कः॥ अनसींग हुजुर येउनु मालूम केले जे प॥ दारव्हे येथे जागीरपैकी माहाराजे आपनासी इनाम जमीन व रोजीना दादेदारद चेरीती दीधला. बमोजीब सनद ता. १० सेवाल सन समसैन सन हजार १०५९
.....
जोवरी दारव्हे माहाराजास जागीर होतें तोवरी तसरुफाती भोगवटा चालीला. यावरी माहाराजाचे दारव्हे तागीर जालियावरी आदा जाला नाही. येईसीयासि आपन ब्राम्हन माहाराजाचा आहे, स्नान-संध्या करुनु माहाराजासी आसीर्वाद देतो. तरी माहाराजे कृपा होउनु आपला इनाम जमीन व रोजमुरा आनखेवाई(?) देवीला पाहिजे. म्हणउनु मालूम केले. तरी वा || नरसीहपंत पुरानीक जुनारदार स।। अनसींग यासि इनाम जमीन व रोजीना दादेदारद येन्हेप्रमाणे मुशकस करुनु दधिले असे. बित ॥
......
येन्हेप्रमाणे मुशकस करुनु दीधले असे. सदरहु लिहिलेप्रमाणे इनामदार मजकुरासि आदा करीत जाणे. अवलादी अफलादी चालवणे. खुर्दखताचा उजूर न करणे. तुम्ही "तालीक घेउनु असल सनद इनामदार मजकुरापाति फिरउनु देणे.
पाठी मागे - तेरीख १ जमादिलावल पै ॥ छ मजकुर माहोर." सावित्रीबाईंची सही " दस्तगाह सावित्रीबाई" अशी आहे.
सावित्रीबाईसाहेब रायबघिणी यांचा जन्म केव्हा झाला हे अद्याप तरी उलगडलेले नाही. उदाजीराम घराण्यात त्यांचे माहेर "कवानकर देशमुख घराणे" असल्याचे सांगितले जाते. तिचा मृत्यू १६६८ नंतर झाला हे निश्चितपणे एका पत्राच्या आधारे सांगता येते. ई. स. १६६८ मध्ये औरंगजेबाने जगजीवनरावचा मुलगा बाबुराव याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो,
"त्याचप्रमाणे, रायबाघनकरिता एक दुशाला पाठविला आहे. "
रायबाघिणी आपल्या घरण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी युद्धभूमीवर उतरली होती. उंबरखिंडीच्या लढाईवेळी (ई. स. १६६१) ती आपल्या आयुष्याच्या उतारवयातच असली पाहिजे. उंबरखिंडीच्या लढाईत मोगल सैन्यात असून शिवाजी महाराजांची प्रशंसा करणारी ही योद्धा स्त्री !! बाबुराव कर्ता झाल्यावर (जवळपास ई. स. १६६५) रायबाघिणीने युद्धभूमीतून निवृत्ती घेतली. ई. स. १६६८ नंतर अल्पकाळात तिचा म्हातारपणी मृत्यू झाला असावा. उदाजीराम घराण्याचा लौकिक बाबूरावच्या काळातच कमी झाला. बाबूराव मोगल मनसबदार होता, पण तो त्याच्या पूर्वजांएवढा कर्तृत्ववान आणि प्रभावी योद्धा नव्हता.
***
संदर्भ सूची :
१. कवींद्र परमानंद कृत शिवभारत
२. "युगवाणी, मे १९४६" च्या अंकात इतिहास संशोधक य. खू. देशपांडे यांनी छापलेली ३ पत्रे.
३. Selected Documents of Shahajahan's Reign.
४. Proceedings of Indian Historical Records Commission 27th Session, Vol.27 Part I, Nagpur, December 1950.
© Copyrights reserved with the author of the blog.
Apratim mahiti.. 🙏
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteवाघिन 😍
ReplyDeleteKhup chan
ReplyDeletegood information
ReplyDelete