Skip to main content

कोण होती रायबागन?


      
               ई. स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मोगल साम्राज्यात दोन गट पडले - एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगजेबाचा. अशी बंडाळी माजली असताना माहुरच्या राजे उदाजीराम (मृ.१६३२) यांचा मुलगा जगजीवनराव याने शहजहान बादशहास एक पत्र लिहिले. त्यात तो म्हणतो, माझ्या शत्रूंचा माझ्या परिवारास संपवून टाकण्याचा कट आहे ". यावर  शहजहानने ४ शाबान १०६८ हिजरी (ई. स. १६५७) रोजी जगजीवनरावाला उत्तर पाठवले, 

"तुझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी बादशहाने सैन्य पाठविले आहे. तू आपल्या सैन्यासह बादशहाच्या दरबारात  हजर व्हावे.

              शहजहानचे सैन्य माहुरला पोहोचले की नाही हे कळत नाही. पुढच्या पत्रातील मजकुरातून शहजहानच्या भेटीला जगजीवनराव गेल्याचेही दिसत नाही.२९ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि दाराशुकोह यांच्यात सामुगढ येथे तुंबळ लढाई झाली. जगजीवनरावाने औरंगजेबाला सहाय्य केले. या लढाईत जगजीवनराव मारला गेला. 

          जगजीवनरावाच्या मृत्यूनंतर उदाजीराम घराण्यात एक पोकळी निर्माण झाली. कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे घराण्याच्या जिवावर उठलेल्या शत्रूनेही उचल खाल्ली. जगजीवनरावची आई - सावित्रीबाईने औरंगजेबाला पत्र लिहिले. ते पत्र सध्या तरी लेखकाकडे उपलब्ध नाही. पण त्या पत्रातील मजकूर वाचून औरंगजेबाला सावित्रीबाई मोगलाईतून बाहेर पडते की काय, अशी शंका आली असावी. औरंगजेबाने सावित्रीबाईंना उद्देशून लिहिलेले १५ सफर १०६८ (इ . स. १६५८) या तारखेचे पत्र उपलब्ध आहे. त्यात तो लिहितो, 

“....शाहबेगखान, जो सरकारचा मदतनीस आहे, त्याच्या मार्फत बादशहाच्या (शहाजहान) शिक्क्यानिशी पूर्वीच हुकूम करण्यात आले आहेत की, आपल्या सर्व नोकर-परिवारासह तिने बादशहाच्या यशस्वी कक्षेत यावे. या हुकुमाप्रमाणे आपल्या लष्करासह येथे येण्याचा तिने निश्चय करावा जिला कृपापात्र होण्याचा हक्क आहे व जी उच्च जातीची आहे, तिने खानसाहेबाच्या विचाराने निघावें आणि आपले मन सर्वथैव ----त ठेवावें; दुसरीकडे पाहूं नये, अथवा दुसऱ्या कोणीकडे लक्ष्य ठेवू नये. बादशहाशी विचारपूस  केलियावर तिला विशेष असे वृत्त कळेल. तिच्या मुलाचे लष्कर विस्कळित झाले नाही. तिने आपल्या मूलखास अगर तेथे असलेल्या जायजादीस नुक्सान पोहोचेल, असें वागू नये. या हुकमाची खुषखबर करून तिने धीर धरावा आणि जे लोक उपयोगी आहेत, त्यांना दूर करूं नये व त्या लोकांना धीर देऊन आपल्या बरोबर आणावें. ही आज्ञा समजून हल्लीच्या परिस्थितीत आमची कृपा आधार आहे, असे तिने समजावे.

            याच दरम्यान उदाजीराम घराण्याच्या शत्रूने - हरचंदरायाने(?) - माहुरवर आक्रमण केले. सावित्रीबाईने आपल्या अल्पवयीन नातवाच्या आणि घराण्याच्या संरक्षणासाठी घोड्यावर स्वार होऊन हाती भाला पेलला. भाल्याला चोळी बांधून तिने स्वतः युद्धात उडी घेतली. तिचा युद्धावेश बघून तिचे सैन्य पेटून उठले. तिने आपल्या भाल्याकडे निर्देश करून तिच्या सैन्यास आवाहन केले, "तुमची बहीण युद्धात उतरली आहे. तिची लाज राखा!!". या लढाईत शत्रूचा दारुण पराभव झाला. शत्रूचा वध करण्यात आला असावा. सावित्रीबाई विजयी झाल्या. राजे उदाजीराम आणि मलिक अंबर यांच्यातील १६१६-१७ साली झालेल्या लढाईसारखीच ही देखील लढाई झाली. औरंगजेबाच्या निर्देशाप्रमाणे सावित्रीबाई आग्र्याला गेल्या असाव्यात. औरंगजेबाला माहुरच्या लढाईची हकीकत कळली. त्याने भरल्या दरबारात सावित्रीबाईंचा  "रायबाघिणी"  हा खिताब देऊन सन्मान केला. "पंडिता" हा खिताब सावित्रीबाईंना कसा मिळाला याबद्दल लेखकास अजून संदर्भ / पुरावा सापडलेला नाही.

             या लढाईमुळे सावित्रीबाईंच्या शौऱ्याची खबर साऱ्या साम्राज्यात पसरली. शिवभारतकार कवींद्र परमानंद सावित्रीबाईविषयी लिहितो, 

"जायामुदयरामस्य जगज्जीवनमातरम् । राजव्याघ्रीति यां प्राहुर्युधि व्याघ्रीमिवोध्दुराम् । सा प्रतापेन महता बताप्रतिहतायुधा ।।
(अर्थ - युद्धात वाघिणीप्रमाणे निर्भयी जी उदाजीरामाची पत्नी नि जगजीवनाची माता, रायबाघिणी नावाने प्रसिद्ध, मोठ्या प्रतापामुळे अप्रतिहतगती स्त्री ....) 

                कवींद्र परमानंदपुत्र देवदत्त व पौत्र गोविंद कृत परमानंदकाव्यम् मध्ये कवि लिहितात,

"पूज्या साहिजहानस्यात्मजस्य समरोद्धता । राजव्याघ्री यथा वीरललने लल भूतले ।। मधूकैटभसंहंत्री हंत्री दुःखस्य सर्वत: । कालीव ललयालोकांत्वमेवाकलयिष्यसि  "

(अर्थ - शहजहानच्या मुलाशी वीरललना, राजव्याघ्रीच जणू युद्धास सज्ज झाली, तशी मधूकैटभ (राक्षसांना मारणारी) काली! सर्व दुःखाचे निवारण करील, असा प्रकाश आपणास दिसून येईल.)

            ई. स. १६३२ मध्ये सावित्रीबाईंचे पती राजे उदाजीराम यांचा मृत्यू झाला त्यावेळी जगजीवनराव अल्पवयीन होता, सावित्रीबाईने महाबतखानाच्या मदतीने अल्पवयीन जगजीवनरावच्या नावे शहाजहान कडून मनसब मिळवून घेतली होती. जगजीवनराव तेव्हापासूनच लष्करी मोहिमांत जात असे. ई. स. १६५८ साली जगजीवनरावच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा ' बाबुराव ' अल्पवयीन होता. तो लष्करी मोहिमांत जाण्यायोग्य अजून झाला नव्हता. त्यामुळे त्याच्यावतीने सावित्रीबाई मोगलांच्या लष्करी मोहिमांत सामील होऊ लागली. सावित्रीबाई या काळात आपल्या आयुष्याच्या उतारवयात असाव्यात. मुलाच्या मृत्यूने तयार झालेली पोकळी भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

                औरंगझेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास दख्खनचा सुबेदार नेमले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता त्याने पुणे, सुपे, चाकण, इंदापूर वगैरे परगणे काबीज केले. यावेळी शाहिस्तेखानाला सहाय्य करण्यासाठी सावित्रीबाईंना पुण्याला पाठविण्यात आले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून आले. शाहिस्तेखानाने कहारतलबखानासोबत सावित्रीबाईची नेमणूक केली आणि आणि चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल काबीज करण्यास मोठ्या फौजेनिशी त्यांना पाठवले. सावित्रीबाई उर्फ रायबाघन हिने आतापर्यंत प्रत्यक्ष राजकारणात जरी भाग घेतलेला दिसत नसला, तरी ती अत्यंत मुरब्बी सरदार राजे उदाजीराम यांची पत्नी होती. तिने लखुजीराजेंचा मृत्यू, निजामशाहीचा अस्तकाळ, शहाजी महाराजांचा संघर्ष, अशा अनेक घडामोडी जवळून बघितल्या असण्याची शक्यता आहे. राजे उदाजीराम यांचा मृत्यू देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी देवगिरीला वेढा घातलेला असताना झाला. तेव्हा तिथे जगजीवनराव होता. सावित्रीबाई देखील असावी. तिने काहरतलबखानाला समज दिली पण त्याने ती ऐकली नसावी, असे तिच्या शिवभरतातील भाषणावरून अनुमान काढत येते. 

                २ फेब्रुवारी, १६६१ ला  उंबरखिंडीत मोगल सैन्याला गाठून तिचा मराठ्यांनी धुव्वा उडविला. लढण्यात काहीही अर्थ नाही हे जाणून सावित्रीबाईंनी काहारतलबास शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ती काहारतलबास म्हणाली, 

शिवाजीरुपी सिंहाच्या आश्रयाखाली असलेल्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे तू वाईट काम केलेस. दिल्लीपती चे सैन्य तू तुझ्या गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोडले ही दुःखाची गोष्ट होय. आजपर्यंत दिल्लीपती ने जे काही यश मिळविले ते सारे तू ह्या अरण्यात बुडविले ! पहा ! मागे व पुढे, उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत. हे पटाईत असलेले तिरंदाज तुझे सर्व सैनिक चित्रातील मनुष्यांप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत. खेदाची गोष्ट ही की दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शाहिस्तेखानाने शत्रूच्या प्रतापरुपी अग्निमध्ये तुला सैन्यासह टाकले. शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे, तू मात्र कोंडला गेला असून आंधळ्या प्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस. फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग, नाहीतर तेच साहसाचे कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत ठरते. म्हणून तू लगेच त्या राजास शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्युपाशातून सोडीव.

तिचा सल्ला ऐकून काहारतलब खानाने शिवाजी महाराजांकडे दुत पाठविला, खंडणी दिली, क्षमा मागितली आणि आपली सुटका करून घेतली. पुढे काही दिवसांत ई. स. १६६३ मध्ये महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. शाहिस्तेखानाची बोटे छाटली. खानाने दहशत खाल्ली. खान पुणे सोडून गेला. सावित्रीबाई आपल्या सैन्यासह  मोगल मूलखात गस्त घालत होती.

                  राजे उदाजीराम घराणे धार्मिक कार्यात आणि दानधर्मात अग्रभागी होते. लोकोपयोगी कामात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. राजे उदाजीराम यांनी १६२४ साली आदिलबाद येथे तळे बांधून घेण्यासाठी आदिलाबादचे देशमुख त्रिंबकजी नाईक याला जमीन दिली. जगजीवनरावने १६४७ मध्ये आणि बाबुरावने १६६० मध्ये ब्राह्मणांना सनदा दिल्या त्याचे उल्लेख य. खू. देशपांड्यांनी करून ठेवले आहेत. सावित्रीबाईंनी ई. स. १६५८ साली दारव्ह्याच्या ब्रह्मणाला दिलेल्या सनदीचा मजकूर खालीलप्रमाणे, 

"अज रख्तखाने महाराजा राजेश्री सावित्रीबाईसाहेबू दामदौलतहू बजानेबू कारकुनानि हाल व इस्तकबाल व देशमुखानि व देसपांडीयानि परगणे साकीन हवेली माहोर बीदानद सू || तीसा खमसैन अलफू सन हजार १०६८. बेशमी नरसींहपंत पुरानिक जुनारदार स।। कः॥ अनसींग हुजुर येउनु मालूम केले जे प॥ दारव्हे येथे जागीरपैकी माहाराजे आपनासी इनाम जमीन व रोजीना दादेदारद चेरीती दीधला. बमोजीब सनद ता. १० सेवाल सन समसैन सन हजार १०५९
.....
जोवरी दारव्हे माहाराजास जागीर होतें तोवरी तसरुफाती भोगवटा चालीला. यावरी माहाराजाचे दारव्हे तागीर जालियावरी आदा जाला नाही. येईसीयासि आपन ब्राम्हन माहाराजाचा आहे, स्नान-संध्या करुनु माहाराजासी आसीर्वाद देतो. तरी माहाराजे कृपा होउनु आपला इनाम जमीन व रोजमुरा आनखेवाई(?) देवीला पाहिजे. म्हणउनु मालूम केले. तरी वा || नरसीहपंत पुरानीक जुनारदार स।। अनसींग यासि इनाम जमीन व रोजीना दादेदारद येन्हेप्रमाणे मुशकस करुनु दधिले असे. बित ॥ 
......

येन्हेप्रमाणे मुशकस करुनु दीधले असे. सदरहु लिहिलेप्रमाणे इनामदार मजकुरासि आदा करीत जाणे. अवलादी अफलादी चालवणे. खुर्दखताचा  उजूर न करणे. तुम्ही "तालीक घेउनु असल सनद इनामदार मजकुरापाति फिरउनु देणे.

पाठी मागे - तेरीख १ जमादिलावल पै ॥ छ  मजकुर माहोर." सावित्रीबाईंची सही " दस्तगाह सावित्रीबाई" अशी आहे.

                सावित्रीबाईसाहेब रायबघिणी यांचा जन्म केव्हा झाला हे अद्याप तरी उलगडलेले नाही. उदाजीराम घराण्यात त्यांचे माहेर "कवानकर देशमुख घराणे" असल्याचे सांगितले जाते. तिचा मृत्यू १६६८ नंतर झाला हे निश्चितपणे एका पत्राच्या आधारे सांगता येते. ई. स. १६६८ मध्ये औरंगजेबाने जगजीवनरावचा मुलगा बाबुराव याला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, 

"त्याचप्रमाणे, रायबाघनकरिता एक दुशाला पाठविला आहे. "

                  रायबाघिणी आपल्या घरण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी युद्धभूमीवर उतरली होती. उंबरखिंडीच्या लढाईवेळी (ई. स. १६६१) ती आपल्या आयुष्याच्या उतारवयातच असली पाहिजे. उंबरखिंडीच्या लढाईत मोगल सैन्यात असून शिवाजी महाराजांची प्रशंसा करणारी ही योद्धा स्त्री !! बाबुराव कर्ता झाल्यावर (जवळपास ई. स. १६६५) रायबाघिणीने युद्धभूमीतून निवृत्ती घेतली. ई. स. १६६८ नंतर अल्पकाळात तिचा म्हातारपणी मृत्यू झाला असावा. उदाजीराम घराण्याचा लौकिक बाबूरावच्या काळातच कमी झाला. बाबूराव मोगल मनसबदार होता, पण तो त्याच्या पूर्वजांएवढा कर्तृत्ववान आणि प्रभावी योद्धा नव्हता.


***



संदर्भ सूची :
१. कवींद्र परमानंद कृत शिवभारत
२. "युगवाणी, मे १९४६" च्या अंकात इतिहास संशोधक य. खू. देशपांडे यांनी छापलेली ३ पत्रे.
३. Selected Documents of Shahajahan's Reign.
४. Proceedings of Indian Historical Records Commission 27th Session, Vol.27 Part I, Nagpur, December 1950.


© Copyrights reserved with the author of the blog.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १

                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.                शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.                भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले ...

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबर...

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवर...

Shama Kolam : The Accidental Bandit

  Life of Shama Kolam : Part One                 Shama Kolam , famously known as Robinhood of Vidarbha , was born on 26 th November, 1899 in village of Niranjan Mahur in Nanded district in an aboriginal ‘Kolam tribe’. It is said that Kolams are Dravidian. Their language – Kolami- has resemblance with Dravidian languages. 1 Kolams are mostly populated in Yavatmal district of Maharashtra state. They are spread to the other adjacent districts of Nanded, Adilabad & Chandrapur. It is one of the most backward aboriginal communities of India. Though they have some cultural semblance with Gonds, they are different from Gonds in many aspects. There’s no caste hierarchy in Kolams. They are mostly divided by surnames which have been adopted from the names of villlages. 2                Shama was born in one of the poor families and brought up in the adjacent jungles of Mahur ...

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्...

दख्खनचे राजकारण : ई. स. १६१६ ते १६२१

          ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले.           इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि  ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाख...

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्...

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शाम...

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष          मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.            ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुर...